Cotton Rate Crisis : कापूस उत्पादक संकटांच्या चक्रव्यूहात; सरकार फिरतेय खुर्चीभोवती गोल... | cotton prices not increasing farmers have to face economic crisis jalgaon news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Farmer Sunil Bunkar selling cotton stored for six months.

Cotton Rate Crisis : कापूस उत्पादक संकटांच्या चक्रव्यूहात; सरकार फिरतेय खुर्चीभोवती गोल...

Jalgaon News : कापसाचे भाव वाढतील, या आशेने गोदामांमध्ये राखून ठेवलेला कापूस कवडीमोल भावाने विकावा लागत असल्याने कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. (cotton prices not increasing farmers have to face economic crisis jalgaon news)

गेल्या पाच-सहा महिन्यांपासून गोदामांमध्ये शेतकऱ्यांनी भाववाढीच्या आशेने कापूस राखून ठेवला आहे. मात्र ही अशाच 'फोल 'ठरत असल्याचे पाहून कवडीमोल भावाने शेतकऱ्यांनी आपले पांढरे सोने विक्रीला काढले आहे.

उत्पादनापेक्षा खर्च अधिक झाल्याने शेतकऱ्यांना आर्थिक संकटांशी संघर्ष करावा लागत आहे. अवकाळी पाऊस गारपीट या नैसर्गिक संकटांबरोबरच शेतमालाला भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित पार कोलमडून गेले आहे.

पांढरे सोने सुरुवातीपासूनच ताऊन सुलाखून निघत आहे. अगदी पहिल्या वेचणीच्या वेळी अवकाळी पावसाने कापसाच्या गुणवत्तेवर परिणाम केला. ओला कापूस वाळत टाकून त्याला सुकवण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली होती. नंतर उत्पादन वाढले परंतु भावच मिळाला नसल्याने आज ना उद्या भाव मिळेल, या भाबड्या आशेवर शेतकऱ्यांनी कापूस गोदामांमध्ये राखून ठेवला आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

पेरा घटणार?

गेल्या काही वर्षांमध्ये खानदेशात कापूस उत्पादक शेतकरी कोणत्या ना कोणत्या चक्रव्यूहात अडकताना दिसत आहे. कधी बोंड आळीचे संकट तर कधी लाल्या रोगाचे आक्रमण.. उत्पादन चांगले झाले तर त्याला भाव नाही... तरीही कापूस उत्पादक शेतकरी मोठ्या आशेने दरवर्षी कपाशीची लागवड करतात. मात्र यंदा उत्पादन आणि खर्च यांचे तारतम्य कुठेच जुळत नसल्याने येत्या वर्षात कापसाचा पेरा घटतो की काय? अशी भीती जाणकार शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.

मुख्यमंत्र्यांना पत्र

पहूर येथील तुषार बनकर यांनी पुढाकार घेऊन टपालाद्वारे एक हजार पत्रांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा आवाज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत पोहविण्याचा प्रयत्न केला. मात्र सरकारच्या सुस्त यंत्रणेने एकाही शेतकऱ्याच्या पत्राला उत्तर दिले नाही. उत्तर सोडाच भावही वाढवला नाही.

अस्मानी आणि सुलतानी संकटांशी संघर्ष करत शेतकरी लढतो आहे. सरकारने भाव वाढवावा, अशी मागणी शेतकरी बांधव करीत आहेत. आजही मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांकडे कापूस पडून आहे. किती दिवस कापूस गोदामांमध्ये ठेवावा? असा प्रश्न शेतकरी बांधव करत आहेत.

"कापूस उत्पादक शेतकऱ्यांना भाववाढ देऊन दिलासा देण्याची नितांत गरज आहे. सहा महिन्यांपासून आम्ही कापूस भाववाढीच्या आशेने राखून ठेवला आहे, मात्र शेवटी आज ७ हजार ३०० रुपयाने कापूस विकला. उत्पादन आणि खर्च यांचे गणित कुठेच जुळत नसल्याने सरकारने आता तरी १० हजार रुपये प्रतिक्विंटल भाव द्यावा." - सुनील बनकर, शेतकरी, पहूर-कसबे