Cotton Rate Crisis : ‘कशी कापसाच्या दराने थट्टा आज मांडली’! भाव अजूनही 8 हजारांपर्यंतच | Cotton Rate crisis price still up to 8 thousand jalgaon news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Cotton Rate Crisis

Cotton Rate Crisis : ‘कशी कापसाच्या दराने थट्टा आज मांडली’! भाव अजूनही 8 हजारांपर्यंतच

Cotton Rate Crisis : नवीन खरीप हंगाम सुरू होण्यास अवघा दीड महिना बाकी असताना, ७० टक्के कापूस अजून शेतकऱ्यांच्या घरात आहे. कापसाचे दर यंदाही दहा ते १३ हजारांपर्यंत मिळतील, अशी आशा शेतकऱ्यांना अजूनही आहे.

परिणामी, ‘माझ्या काळजाची तार आज छेडली, कशी कापसाच्या दराने थट्टा आज मांडली’, या पिंजरा चित्रपटातील गीताची आठवण शेतकऱ्यांना होत आहे. (Cotton Rate crisis price still up to 8 thousand jalgaon news)

कापसाचा दर दहा ते १३ हजार मिळेल, या आशेने शेतकऱ्यांनी २०२२ च्या खरीप हंगामात ११० टक्के कापसाची लागवड केली होती. मात्र, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कापसाला मागणी नाही. आंतरराष्ट्रीय स्तरावर कापसाच्या खंडीचा दर ५७ ते ५८ हजार आहे. तोच दर आपल्याकडे ६२ हजार आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय कापसाला मार्केट नाही.

शासनाकडून खरेदी नाही

शेतकऱ्यांनी सावकारांकडून घेतलेल्या कर्जापोटी रकमेच्या व्याजात रोज वाढ होत आहे. शासनाने हमी भावाप्रमाणे कापूस खरेदीही सुरू केलेली नाही. ती खरेदी सुरू केली असती, तर व्यापाऱ्यांकडून कापसाला जादा दर मिळाला असता, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

‘पांढरे सोने’ म्हणून प्रख्यात असलेल्या कापसाकडे शेतकरी ‘नगदी सोने’ म्हणून पाहतात. गेल्या वर्षी कापूस टंचाईमुळे कापसाला १३ हजारांचा दर मिळाला होता. यंदाही कापसाला मागणी राहील, दर किमान दहा हजार रुपये मिळेल, या आशेने शेतकऱ्यांनी कापूस पेरला.

अतिवृष्टी झाली. त्यानंतरही उत्पादन चांगले आले. हंगाम येताना काही ठिकाणी कापसाला १५, १३ व ११ हजारांचा दर व्यापाऱ्यांनी दिला. शेतकऱ्यांना याच दराची अपेक्षा कायम राहिली. नंतर मात्र चांगला हंगाम हातात आला अन्‌ भाव आठ ते साडेआठदरम्यानच राहिले.

दिवाळीत शेतकऱ्यांनी याच दरात काही प्रमाणात कापूस विकला. मात्र, किमान दहा हजारांचा दर मिळेल, या आशेने कापूस घरात साठविण्यात आला. सध्याही ७० टक्के कापूस शेतकऱ्यांच्या घरात पडून आहे. कापसाचे उत्पादन घेताना झालेला खर्च कापूस विकून काढायचा, असे शेतकऱ्यांनी ठरविले होते. मात्र, दर दहा हजार नसल्याने शेतकऱ्यांनी कापूस अद्याप विकलेला नाही.

हेही वाचा : What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’

बाजारात रोजची मागणी २१ हजार गाठींच्या कापसाची आहे. मात्र, केवळ दोन हजार गाठींचा कापूस येत आहे. अजून किती दिवस कापसाचे दर कमी राहणार, असा प्रश्‍न शेतकऱ्यांना पडला आहे. जिल्ह्यात कापूसटंचाई निर्माण झाल्याने जिल्ह्यातील दीडशेपैकी केवळ ७५ जिनिंग प्रेसिंग मिल्स सुरू होत्या. आता त्यातील ५० जिनिंग बंद झाल्या आहेत, तर २५ जिनिंग बंद होण्याच्या मार्गावर आहेत.

दृष्टिक्षेपात...

*दर वर्षी होणाऱ्या कापसाच्या गाठी- १८ ते २५ लाख
*गतवर्षी उत्पादित गाठी- नऊ लाख
*खंडीला मिळालेला दर- ६२ हजार
*शेतकऱ्यांना २०२२ ला मिळालेला दर- नऊ ते १३ हजार
*आतापर्यंत झालेले गाठींचे उत्पादन- सुमारे दहा लाख
*यंदाचा सध्याचा दर- सात हजार ८०० ते आठ हजार

"कापूस दराबाबत अद्याप काहीही सांगता येत नाही. घरात पडून कापसाचा दर्जा खालावतोय. वजन कमी होते, याचाही विचार करून शेतकऱ्यांनी कापूस विक्रीचा निर्णय घ्यावा. अक्षय तृतीयेला कापूस मोठ्या प्रमाणात विक्रीस येण्याची अपेक्षा आहे."

-प्रदीप जैन, अध्यक्ष, खानदेश जिनिंग प्रेसिंग असोसिएशन

टॅग्स :JalgaonCotton Crop crisis