esakal | पैशांसाठी तरुणाचे अपहरण; मग काय, व्हाॅटसअप लोकेशनद्वारे पोलिसांचा सिनेस्टाईल शोध सुरू

बोलून बातमी शोधा

पैशांसाठी तरुणाचे अपहरण; मग काय, व्हाॅटसअप लोकेशनद्वारे पोलिसांचा सिनेस्टाईल शोध सुरू

पोलिसांना बघताच मारहाण करणाऱ्यांनी दोघा तरुणांपैकी कमल मौर्या याला चाकू लावत बँगसह त्यांच्या दुचाकीवर बसवत अपहरण करून नेण्यात आले.

पैशांसाठी तरुणाचे अपहरण; मग काय, व्हाॅटसअप लोकेशनद्वारे पोलिसांचा सिनेस्टाईल शोध सुरू
sakal_logo
By
रईस शेख

जळगाव : शहरातील इच्छादेवी चौकातून मध्य प्रदेशातील २२ वर्षीय तरुणाचे अपहरण केल्याची घटना रविवारी रात्रीच्या सुमारास घडली. तरुणाला बळजबरी दुचाकीवर बसवत असतानाच पोलिस धडकले. पोलिसांना पाहताच संशयितांनी धूम ठोकली. मात्र, रामानंदनगर पोलिसांनी सापडलेल्या साथीदाराला पोलिसीखाक्या दाखवताच त्याने माहिती दिली. अपहरण झालेल्या तरुणाने व्हॉट्स‌ॲप लोकेशन पाठवल्यावर सुप्रीम कॉलनीतील निर्मनुष्य परिसरातील खुबचंद साहित्या टॉवरच्या तीनमजली इमारतीतून मध्यरात्री उशिरा अपहृरण झालेल्या तरुणाची सिनेस्टाइल सुटका करण्यात पोलिसांना यश आले आहे. पहाटे गुन्ह्यातील तिन्ही संशयितांना धारदार शस्त्रासह अटक केली आहे. 


पोलिस तक्रारीनुसार, शेतीकामाच्या शोधात सुरसिंग पावरा (वय ४२, रा. शिरपूर धुळे) व कमल मौर्या असे दोघेही तरुण (एमएच ०९, एमडी ५९६०) या दुचाकीने जळगावी आले होते. सायंकाळी पावणेआठच्या सुमारास इच्छादेवी चौकातील मैदानावर दोघेही मित्र उभे असताना तीन अज्ञात तरुण त्यांच्याजवळ आले. दोघांना मारहाण करत असताना रामानंदनगर पोलिसांना माहिती मिळाली. पोलिस नाईक संजय सपकाळे, रवींद्र पाटील घटनास्थळावर दाखल झाले. पोलिसांना बघताच मारहाण करणाऱ्यांनी दोघा तरुणांपैकी कमल मौर्या याला चाकू लावत बँगसह त्यांच्या दुचाकीवर बसवत अपहरण करून नेण्यात आले. अंधारात अपहरणकर्त्यांचा तिसरा साथीदार मात्र पोलिसांच्या तावडीत सापडला. गणेश सोमवंशी (रा. खुबचंद साहित्या टॉवर, सुप्रीम कॉलनी) असे त्याने नाव सांगितल्यावर पोलिसांनी सुरसिंग पावरा व गणेश अशांना पोलिस चौकीत आणल्यावर प्रकाराचा उलगडा झाला. 

मोबाईलवरून पैशांची मागणी 

अपहरणकर्त्यांनी कमल मौर्य या तरुणाला खुबचंद साहित्या टॉवर (सुप्रीम कॉलनी) येथे घेऊन जात त्याला दुसऱ्या मजल्यावर कोंडून ठेवत त्याच्या साथीदाराला फोन करून पैशांची मागणी करण्यात आली. कमलने सुरसिंगच्या मोबाईलवर फोन करून अपहरणकर्त्यांनी चाकू लावून मारहाण करत पैशांची मागणी केल्याची माहिती दिल्यावरून सुरसिंगने त्याच्या मोबाईलची रेकॉर्डिंग पोलिसांना ऐकवली.

व्हॉट्स‌ॲप लोकेशनची साथ 
निरीक्षक अनिल बडगुजर, संजय सपकाळे, रवींद्र पाटील, प्रशांत जगदाळे, शिवाजी धुमाळ, सुशील चौधरी पथकाने शोधकार्य सुरू केले. कमल मौर्य याला इमारतीत कोंडून संशयित निघून गेल्यावर कमलचा पुन्हा फोन आल्याने पोलिसांनी त्याला व्हॉट्सॲप लोकेशन पाठवण्यास सांगितले. तसेच त्यांच्या नंबरवरून त्यांचे लोकेशन शोधले जात होते. पोलिस पथकाने मध्यरात्री इमारतीचा शोध लावण्यात यश मिळविले. पोलिसांच्या ताब्यातील भामटा गणेश सूर्यवंशी याने त्याचे साथीदार, विजय पवार, शुभम पाटील अशा तिघांची नाव, पत्ते सांगितल्यावर रात्रीतून त्यांना अटक झाली.