मिरवणूक काढल्याने भाजप आमदार मंगेश चव्हाणांसह दिडशे जणांविरुद्ध गुन्हा दाखल 

मिरवणूक काढल्याने भाजप आमदार मंगेश चव्हाणांसह दिडशे जणांविरुद्ध गुन्हा दाखल 


चाळीसगाव : सध्याच्या कोरोना काळात सोशल डिस्टेन्सिंगचे पालन न करता, तोंडाला मास्क न वापरता छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्ताने मिरवणुकीचे आयोजन करन शासनाच्या आदेशाचे उल्लंघन केले म्हणून येथील आमदार मंगेश चव्हाण यांच्यासह १०० ते १५० जणांविरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलिस हवालदार पंढरीनाथ पवार यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, शुक्रवारी (१९ फेब्रुवारी) छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आमदार मंगेश चव्हाण व कार्यकर्त्यांनी शहरातील रेल्वेस्थानकापासून छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत (सिग्नल चौक) मिरवणूक काढली. कोरोना काळात सोशल डिस्टेन्सिंगचे पालन करण्याचे शासनाचे निर्देश होते. असे असतानाही आमदार चव्हाण यांनी कोरोनाचा संभाव्य धोका लक्षात घेता, जिल्हाधिकाऱ्यांनी निर्गमित केलेल्या आदेशांकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे त्यांच्यासह सौरभ पाटील, नगरसेवक घृष्णेश्‍वर पाटील, चिरागोद्दीन शेख, दीपकसिंग राजपूत, बबन पवार, कैलास पाटील, नगरसेवक नितीन पाटील, कल्पेश पाटील, करन राजपूत, अनिकेत गवळी, भागवत पाटील, पंकज पाटील, प्रमोद वाघ, दर्शन शिंदे, कुणाल पाटील, योगेश कुमावत यांच्यासह इतर १०० ते १५० जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलिस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक किरण दांडगे करीत आहेत. 

सरकारचा जावईशोध : चव्हाण 
दरम्यान, आमदार मंगेश चव्हाण यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झाल्याने शिवप्रेमींमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे. या संदर्भात आमदार चव्हाण यांनी सांगितले, की एकीकडे महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांच्या हजारोंच्या सभा होत असताना दुसरीकडे मात्र शिवजयंती साजरी करण्यावर मोठ्या प्रमाणावर निर्बंध सरकारने घातले. शनिवारी सरकारच्या तुघलकी निर्बंधाना झुगारत शिवप्रेमींनी काढलेल्या मिरवणुकीत आपण सहभागी होऊन त्यांचा उत्साह वाढविला. मात्र, छत्रपती शिवाजी महाराज चौकात मिरवणूक येताच या मिरवणुकीला अडविण्याचे पाप सरकारच्या आदेशावरून पोलिसांनी केले. आजपर्यंत महाराष्ट्रात तरी शिवजयंतीची मिरवणूक यापूर्वी कधीच अडवली गेली नाही. पोलिसांनी मिरवणूक अडविल्यानंतर संतापाची लाट शिवभक्तांमध्ये निर्माण झाली होती. आम्ही शिवरायांना आदर्श मानणारे कायदा पाळणारे शिवभक्त आहोत. मात्र, पोलिसांच्या आडकाठीमुळे शिवभक्त व पोलिसांमध्ये वाद निर्माण होऊन परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये, यासाठी उपस्थित सर्व शिवप्रेमींची समजूत घालत त्यांना मिरवणूक थांबविण्याची विनंती केली. त्यानंतर शांततापूर्ण पद्धतीने शिवप्रेमी तरुणांनी मिरवणूक संपवली. मात्र, पोलिसांनी शनिवारी माझ्यासह १५० शिवप्रेमींवर गुन्हे दाखल केल्याचे मला कळाले. राज्यात मुघलांच्या वंशजांचे सरकार आहे, की काय असा प्रश्न निर्माण व्हावा अशी परिस्थिती आहे. शिवरायांसाठी असे एकच काय तर एक लाख गुन्हे अंगावर घ्यायला मी तयार आहे. राष्ट्रवादीची परिसंवाद यात्रा, शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांच्या समर्थनार्थ मोर्चा, काँग्रेसचे नाना पटोले यांच्या पदग्रहण सोहळा यासाठी हजारोंची गर्दी केली तरी कोरोना होत नाही. मात्र, शिवजयंतीसाठी एकत्र आल्यानेच कोरोना पसरतो असा जावईशोध या तीन तिघाड्या सरकारने लावला आहे. या सरकारने जो दुजाभाव शिवजयंतीबाबत केला आहे, तो शिवप्रेमी कधीच विसरणार नाही हेही त्यांनी लक्षात घ्यावे असे आमदार चव्हाण यांनी सांगितले. 

संपादन- भूषण श्रीखंडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com