गेलेले पैसे, दागीने परत मिळाले म्हणून आईच्या एका डोळ्यात आनंद; तर दुसऱ्या डोळ्यात मुलाचे दुःख !
पोलिसांनी खाक्या दाखवताच त्याने शेतात लपविलेला काही माल काढून दिला. काही माल त्याने विकून टाकला होता.
रावेर : तालुक्यातील निरुळ गावी एका गरीब शेतकरी जोडप्याच्या घरी रोख रकमेसह 85 हजार रुपयांच्या दागिन्यांची चोरी झाली पण त्यांच्या मद्यपी मुलानेच चोरी केल्याचा छडा पोलिसांनी लावून दागिने मातेला परत केल्याने एका डोळ्यात हसू आणि दुसऱ्या डोळ्यात आसू आल्याची हृदयस्पर्शी घटना आज घडली.
आवश्य वाचा- तहान भागविण्यासाठी खाली उतरला अन् जीवनच संपले; धावत्या रेल्वेत चढणे पडले महागात
रावेर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील निरुळ या गावी सयाबाई योगराज खैरे (वय 50 वर्षे) ही शेतकरी महिला आपल्या पती आणि मुलासह राहते. त्यांची निरुळ गावात दोन घरे आहेत. त्यापैकी एका घरात सयाबाईने पेटीत काही दागिने आणि रोख रक्कम ठेवली होती व घराला कुलूप लावले होते.15 डिसेंबरला त्यांच्या कुलूप असलेल्या घरी घरफोडी झाली आणि घरातील रोख 20 हजार रुपये तसेच 35 हजार रुपये किमतीची सोन्याची अंगठी, 30 हजार रुपये किमतीच्या चांदीच्या पाटल्या व एक चांदीचे कडे असा 85 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने घरफोडी करून चोरून नेला अशी फिर्याद सयाबाईने दिल्याने गुन्हा दाखल झाला होता.
चोरी झाल्यापासून जितेंद्र फरार..
पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांचे मार्गदर्शना खाली पोलिस उपनिरीक्षक मनोहर जाधव ,पो कॉ जगदीश पाटील,पो ना महेंद्र सुरवाडे, पो कॉ प्रमोद पाटील, सुरेश मेढे, सुकेश तडवी, महेश मोगरे,कुणाल सोनवणे,विशाल पाटील, प्रमोद पाटील या पोलीस पथकाने गोपनीय माहिती मिळविली. फिर्यादीचा मुलगा जितेंद्र योगराज खैरे हा मद्यपी असून घरफोडी झाल्यापासून तो घरात नसल्याची आणि सयाबाईने दागिने व पैसे बंद घरातील पेटीत ठेवले असल्याची माहिती जितेंद्रला होती हे ही पोलिसांना कळाले.
आवर्जून वाचा- चिमुकली होती म्हणून वाचले आई अन् लहान बहिणीचे प्राण..घडला प्रकार भयानक
पोलिस पोहचले दारुच्या अड्यावर
पोलिसांनी जितेंद्रचा शोध घेतला असता तो एका दारूच्या अड्ड्यावर मिळून आला. त्याला पोलिसांनी खाक्या दाखवताच त्याने शेतात लपविलेला काही माल काढून दिला. काही माल त्याने विकून टाकला होता.पोलिसांनी शेतातून आणलेल्या सयाबाईच्या वस्तू व रोख 20 हजार रुपये तिला परत करण्याचा आदेश न्यायाधीश पवन राठोड यांनी आदेश दिले. पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांनी पोलिस उपनिरीक्षक श्री जाधव व श्री नाईक यांच्यासोबत सयाबाईला ते परत केले.
हेही वाचा- शॅाटकट रस्ता उठला जीवावर; पुरातत्व विभागाचे एतिहासीक दगडी भितींच्या बोगद्याकडे दुर्लक्ष
एका डोळ्यात आनंद तर...
सयाबाईच्या एका डोळ्यात चोरीला गेलेले पैसे परत मिळाल्याचा आनंद होता, हसू होते तर दुसऱ्या डोळ्यात आपलाच मुलगा चोर निघाल्याचे दुःख होते, आसू होते. पोलिसांना मात्र आपले कर्तव्य पार पाडल्याचे समाधान होते. सयाबाई आणि तिचा पती घरी गेले संशयित आरोपी मुलगा मात्र पोलिसांच्या कारवाईला सामोरा जात आहे. त्याच्यावर आपल्याच घरी घरफोडी केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.
संपादन- भूषण श्रीखंडे