
Jalgaon Agriculture News : यंदा मॉन्सूनच्या लहरीपणावरच ‘पीकपाणी’
Jalgaon News : ‘अल निनो’च्या प्रभावामुळे यंदा पाऊस कमी पडणार आहे. पावसाच्या लहरीपणावरच शेतकऱ्यांचे ‘पीकपाणी’ अंवलबून आहे. यंदा एप्रिल ते मे महिन्यात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला. (crop sowing of farmers is dependent on rain jalgaon news)
उन्हाळ्यात नदी-नाल्यांना पूर आले. त्यामुळे यंदाच्या मान्सूनमध्ये अनियमितता असू शकते, असा अंदाज जिल्हा प्रशासनासह कृषी विभागाने वर्तविला आहे. १ जूनपासून बियाणे विक्रीस सुरवात होत असून, शेतकऱ्यांनी बियाणे, खते खरेदीचे पक्के बिल घ्यावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.
यंदा सूर्याचा मृगशीर्ष नक्षत्रात लवकरच प्रवेश होणार आहे. राज्यात मान्सून सक्रिय झाल्यानंतरच अन् मातीला पुरेसा ओलावा मिळेपर्यंत पाऊस आल्यानंतरच शेतकऱ्यांनी पेरणीस सुरवात करावी, असा सल्ला कृषी विभागाने दिला आहे. यंदा ७ लाख ४१ हजार हेक्टरवर खरीप पेरणीचे नियोजन असल्याचे कृषी विभागाने सांगितले.
जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कापूस बियाण्याची खरेदी १ जूननंतरच करावी. सोयाबीन बियाणे घरचे अथवा कृषी केंद्राकडून खरेदी केलेल्या बियाण्याची उगवण क्षमता तपासणी करून व बीजप्रक्रिया करूनच घ्यावे. पुरेसा पाऊस (१०० मिलिमीटर) पडल्याशिवाय पेरणीची घाई करू नये.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
कापूस पिकाची सरी वरंबा पद्धतीने व सोयाबीन पिकाची रूंद वरंबा सरी पद्धतीने किंवा टोकण पद्धतीने लागवड करावी. असे केल्यास लागवडीसाठी बियाणे कमी लागते. पिकातील हवा खेळती राहते. कीडरोगांचा प्रादूर्भाव कमी होतो.
गेल्या वर्षी अतिपावसामुळे सोयाबीन पिकाला अंशतः फटका बसला होता. उत्पादनात काहीशी घट झाल्यामुळे यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत सोयाबीनची लागवड कमी होईल, असा अंदाज आहे.
अतिपाऊस झाल्यास जास्तीचे पाणी सरीद्वारे बाहेर पडते व कमी पाऊस झाल्यास सरीमध्ये मुरलेल्या पाण्याद्वारे मूलस्थानी जलसंधारण होऊन पिकास पाण्याचा ताण पडत नाही, असे कृषी विभागातर्फे सांगण्यात आले.
आकडे बोलतात...
*जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्र--११ लाख ६३ हजार ९०० हेक्टर
*लागवडीलायक क्षेत्र--८ लाख ४८ हजार ३०० हेक्टर
*महसूल मंडले--८६
*खरीप पिकाचे क्षेत्र--७ लाख ७० हजार ८४८ हेक्टर
*प्रत्यक्ष पेरणी झालेले क्षेत्र--७ लाख ४२ हजार ७१६
*यंदाचे पेरणी अपेक्षित क्षेत्र--७ लाख ६३ हजार २००
"शेतकऱ्यांनी खरीप पेरण्यांची घाई करू नये. पावसाचा अंदाज सांगता येत नाही. १०० मिलिमीटर पाऊस पडल्यानंतरच पेरण्या कराव्यात. बागायती कपाशीची पेरणीही जूनमध्येच करावी. बी-बियाणे, खते घेताना पक्की बिले घ्यावीत." -संभाजी ठाकूर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी