
Jalgaon News : नापिकीने कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या
Jalgaon News : देव्हारी येथील तरुण शेतकऱ्याने सततची नापिकी आणि कर्जबाजारी पणाला कंटाळून राहत्या घरात गळफास घेतला. अमोल अरुण पाटील (वय २४; रा. देव्हारी ता. जि. जळगाव) असे मयत तरुण शेतकऱ्याचे नाव आहे. (debt ridden farmer commits Suicide jalgaon news)
बुधवार (ता. २६) रोजी संध्याकाळी अमोल पाटील यांनी गळफास घेत आयुष्य संपविले. एकुलता तरुण मुलगा गेल्याने आईचा आक्रोश मन हेलावून टाकणारा होता.
कुटुंबीय, नातेवाइकांनी दिलेली माहिती अशी की, अमोल पाटील हा आई कल्पना यांच्यासोबत देव्हारी येथे वास्तव्याला होता. शेती करून तो आपला उदरनिवाह करीत होता. गेल्या दोन वर्षांपासून होत असलेली सततची नापिकीमुळे तो कर्जबाजारी झाल्याने चिंतेत होता. शिवाय शेती करण्यासाठी काढलेले सोसायटीचे कर्ज आणि सावकारी कर्जाफेडीसाठी त्याच्याकडे तगादा सुरु होता.
हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार
पिकांच्या नुकसानीला कंटाळून अमोलने बुधवार (ता.२६) रोजी सायंकाळी ७ वाजता राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. सायंकाळी आई कल्पनाबाई पाटील या घरी आल्या तेव्हा त्यांनी मुलाचा मृतदेह पाहून हंबरडा फोडला. शेजारी राहणाऱ्या ग्रामस्थ व तरूणांनी खाली उतरवून त्याला जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी तपासून मयत घोषित केले.
यावेळी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नातेवाइकांनी एकच गर्दी केली होती. जळगाव तालुका पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयत अमोलच्या पश्चात आई कल्पनाबाई आणि विवाहित बहिण रूपाली असा परिवार आहे.