धुळ्यात रिंग रोड, उड्डाणपुलास मंजुरी

खासदार भामरे : गडकरींच्या हस्ते उद्या प्रकल्पांचे उद्‌घाटन
Dhule bridge construction
Dhule bridge constructionsakal

धुळे : शहरासाठी रिंग रोडला, तसेच चाळीसगाव चौफुलीवर उड्डाणपुलाला मंजुरी मिळाली आहे, असे सांगताना शुक्रवारी दौऱ्यावर असलेले केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील विविध प्रकल्पांचे प्रत्यक्ष, ऑनलाइन उद्‌घाटन, भूमिपूजन होणार असल्याची माहिती खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी दिली.

दौऱ्यासंदर्भात बुधवारी सायंकाळी झालेल्या पत्रकार परिषदेस खासदार भामरे यांच्यासह जिल्हा बँकेचे अध्यक्ष राजवर्धन कदमबांडे, उपमहापौर अनिल नागमोते, भाजपचे शहर- जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल, भाजपचे प्रवक्ते संजय शर्मा, जिल्हा परिषदेचे कृषी सभापती संग्राम पाटील आदी उपस्थित होते.

खासदार भामरे म्हणाले, की धुळे शहरालगत सहा राष्ट्रीय महामार्ग आहेत. त्यांच्या चौपदरीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. सुरत- नागपूर महामार्गाचे चौपदरीकरण ७५ टक्के पूर्ण होत आले आहे. धुळे- चाळीसगाव महामार्ग चौपदरीकरणाच्या कामाला गती आली आहे. कुसुंबा- मालेगाव, पिंपळनेर - सटाणा, शेवाळी- नंदुरबार या महामार्गांचे कामही लवकरच पूर्ण होणार आहे. धुळे शहरातील चाळीसगाव चौफुलीवर उड्डाणपुलाची मागणी होती. त्यानुसार मंत्री गडकरी यांनी या उड्डाणपुलासाठी मंजुरी दिली आहे.

शहरात रिंग रोडच्या कामाला मंजुरी मिळाली असून हे काम लवकरच हाती घेतले जाणार आहे. बोरविहीर- नरडाणापर्यंतच्या ५६ किलोमीटर रेल्वेमार्गाचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. पाणी, रेल्वे आणि राष्ट्रीय महामार्ग या तीन मूलभूत सुविधा ज्या ठिकाणी असतात, तेथे औद्योगिक विकास झपाट्याने होत असतो. त्यामुळे या बाबींकडे केंद्र शासनाने प्राधान्याने लक्ष दिले असून जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील आहे. धुळे- नाशिक जिल्ह्याच्या मध्यवर्ती भागात झोडगेजवळ लवकरच तीनशे एकरवर मोठा प्रकल्प आकाराला येत असून त्यामुळे सहा जणांच्या हाताला काम मिळणार आहे.

सुलवाडे- जामफळ उपसा सिंचन योजनेचे काम २०२४ पर्यंत पूर्ण केले जाणार आहे, असे सांगत खासदार भामरे यांनी मंत्री गडकरी यांच्या दौऱ्याची माहिती देत त्यांच्या उपस्थितीत विविध विकास कामांचे उद्‌घाटन, भूमीपूजन, लोकार्पण, कार्यारंभ सोहळा येथील राजर्षी शाहू महाराज नाट्यगृहात होणार असल्याचे नमूद केले.

मंत्री गडकरी यांच्या हस्ते स्टार्टअप प्रदर्शनाचे उद्‌घाटन

धुळे उद्योग प्रबोधिनी व युवा उद्योजकांच्या स्टार्ट-अप प्रदर्शनाचे २२ एप्रिलला सकाळी अकराला येथील अग्रसेन हॉल (पांझरा नदी किनारी) मध्ये केंद्रीय रस्ते, वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याहस्ते उद्‌घाटन होईल, अशी माहिती उद्योग प्रबोधिनीचे संस्थापक हर्शल विभांडिक, श्रीराम देशपांडे यांनी दिली.

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांची प्रमुख उपस्थिती असेल. उद्योग प्रबोधिनीचे संस्थापक प्रकाश पाठक अध्यक्षस्थानी असतील. खासदार डॉ. सुभाष भामरे, आमदार जयकुमार रावल, आमदार गिरीश महाजन, आमदार अमरिशभाई पटेल, जिल्हा बँकेचे चेअरमन राजवर्धन कदमबांडे, चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष बबन चौधरी, महापौर प्रदीप कर्पे, भाजयुमोचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील, भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल आदी उपस्थित असतील.

उद्योग प्रबोधिनीच्या माध्यमातून धुळ्यात २३ युवा नवउद्योजकांना त्यांच्या स्टार्ट-अप आणि नव्या उद्योगासाठी तीन कोटीवर निधी भांडवल स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आला. कुटुंबात कोणतीही उद्योजकतेची पार्श्वभूमी नसताना सामान्य मध्यमवर्गीय घरातील होतकरू तरुणांनी मेहनतीने स्वतःची स्टार्टअप/उद्योग सुरू करून इतरांना रोजगार दिला. अशा युवा नवउद्योजकांना भेटून त्यांच्याशी संवाद साधण्याची संधी प्रदर्शनातून मिळेल. सकाळी नऊ ते सायंकाळी पाचदरम्यान युवा उद्योजकांचा स्टार्ट-अप प्रदर्शन सुरू राहील, अशी माहिती उद्योग प्रबोधिनीचे संस्थापक विभांडिक, श्री. देशपांडे यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com