
Jalgaon District Bank : जिल्हा बँक अध्यक्षपदासाठी पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत निर्णय; शनिवारी होणार बैठक
Jalgaon News : जळगाव जिल्हा बँक (District Bank) अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या उमेदवारांबाबत अंतिम निर्णय घेण्यासाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत निवडीअगोदर शनिवारी (ता. ११) सकाळी बैठक होणार असल्याचे सांगण्यात आले. (district bank Decision in presence of Guardian Minister for the post of District Bank Chairman jalgaon news)
भाजप नेते व ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांचीही बैठकीला उपस्थित राहण्याची शक्यता आहे. जळगाव जिल्हा बँक अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडीसाठी शनिवारी संचालक मंडळाची विशेष सभा होणार आहे.
बँकेत महाविकास आघाडी व शिवसेना (शिंदे गट) यांची संयुक्त सत्ता आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे दहा, शिवसेना शिंदे गटाचे पाच, कॉंग्रेसचे तीन, शिवसेना ठाकरे गटाचे दोन, तर भाजपचा एक सदस्य आहे. राज्यात भाजप व शिवसेना शिंदे गटाची सत्ता आहे.
जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील शिंदे गटाचे आहेत. तर ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन भाजपचे आहेत, तर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार एकनाथराव खडसे यांच्याकडे बँकेचे नेतृत्व आहे.
त्यामुळे त्यांच्या संयुक्त बैठकीतच अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या उमेदवारांचा निर्णय होईल. मात्र, सर्वांच्या एकमताने हा निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
हेही वाचा : तुमच्याकडं कागदी स्वरुपातले शेअर आहेत? मग हे वाचाच....
सध्या विधिमंडळ अधिवेशन सुरू असल्याने सर्वच नेते मुंबईत आहेत. त्यामुळे शनिवारी सकाळी हे नेते जळगावात येण्याची शक्यता आहे.
त्यांच्या उपस्थितीत संचालकांच्या विशेष निवडीच्या सभेपूर्वी अध्यक्ष व उपाध्यक्षपदाचे नाव निश्चित करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. जिल्हा दूध संघात भाजपचा अध्यक्ष असल्यामुळे जिल्हा बँकेत शिवसेना शिंदे गटाला संधी मिळण्याची शक्यता आहे.
मात्र, यातही भाजप आपल्या पदरात अध्यक्षपद घेण्यासाठी खेळी करू शकते. यात त्यांना राष्ट्रवादीच्या संचालकांची साथ असण्याची शक्यता व्यक्त होत आहे. मात्र, अध्यक्ष व उपाध्यक्षपद निवडीसाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर निर्णय सोपविला जाण्याची शक्यता आहे.