Jalgaon News : जिल्ह्याची ‘आरोग्यसेवा समन्वय समिती’ बेपत्ता! टायफॉइड, मलेरियाचे सर्वाधिक रुग्ण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

typhoid

Jalgaon News : जिल्ह्याची ‘आरोग्यसेवा समन्वय समिती’ बेपत्ता! टायफॉइड, मलेरियाचे सर्वाधिक रुग्ण

जळगाव : सध्या शहरासह जिल्ह्यात टायफॉइड, मलेरिया, सर्दी, खोकल्याचा संसर्ग पसरला आहे. व्हायरल इन्फेक्शनचे रुग्णही सर्वत्र आढळून येत आहे. सकाळपासून रात्री उशिरापर्यंत खासगी रुग्णालयात तपासणीसाठी रुग्णांची गर्दी दिसत आहे.

डेंगी, मलेरिया, स्वाइन फ्लू, टायफॉइड आदी संसर्गजन्य रोगांवर आळा घालण्यासाठी, तसेच सर्वसामान्य नागरिकांपर्यंत प्रभावी व किफायतशीर आरोग्यसेवा पुरविण्यासाठी शासकीय आरोग्यसेवा संस्था, खासगी रुग्णालये यांच्यात समन्वय साधण्यासाठी ‘जिल्हा आरोग्यसेवा समन्वय समिती’ राज्य शासनाने प्रत्येक जिल्हास्तरावर गठित केली आहे.

कोरोनाकाळात ही समिती कार्यरत होती. त्या काळात दोन-तीन वेळा बैठका झाल्या. मात्र, कोरोनोचा प्रादुर्भाव कमी होताच या समितीच्या गेल्या दोन वर्षांत बैठका झालेल्या नाहीत. (Districts Health Care Coordination Committee ignorance Most cases of typhoid malaria Jalgaon News)

जिल्हा रुग्णालयात टायफॉइड, मलेरिया आजाराचे दररोज आठशे ते हजाराच्या जवळपास रुग्ण तपासणी करीत आहेत, तर सर्वच खासगी रुग्णालयात अशा रुणांची तपासणीसाठी लांबच्या लांब रांगा लागल्याचे चित्र आहे. रक्त, लघवी तपासणीसाठीही रुग्ण गर्दी करीत असल्याचे चित्र आहे.

अशी आहे समिती : अध्यक्ष पालकमंत्री, उपाध्यक्ष जिल्हा परिषद अध्यक्ष व महापौर, सदस्य दोन खासदार, दोन आमदार, खासगी क्षेत्रातील दहा नामवंत डॉक्टर्स, सार्वजनिक क्षेत्रातील दोन अशासकीय संस्था, जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, वीज वितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता,

सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता, आरोयसेवा परिमंडलाचे उपसंचालक, जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता, जिल्हा आरोग्याधिकारी, पालकमंत्र्यांनी नामनिर्देशित केलेले दोन सदस्य, महापालिकेचे आरोग्याधिकारी, सदस्य सचिव जिल्हा शल्यचिकित्सक.

हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!

समितीची ही आहेत कार्य : सार्वजनिक आरोग्यव्यवस्था सुदृढ करण्यासाठी उपाययोजनेबाबत शासनाला शिफारस करणे, साथ रोगाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी वेळीच प्रतिबंधक उपाय करणे, रोगनिदान, चिकित्साबाबत विविध वैद्यकीय विभागांशी समन्वय साधून कार्यवाही करणे, सार्वजनिक आरोग्य रुग्णालये व कार्यालयांच्या कामाचा आढावा घेणे,

आरोग्य शिबिर घेणे, रक्तदान शिबिर घेणे, आरोग्यविषय जाणीव-जागृतीच्या मोहिमा राबविणे, ‘बेटी बचाओ-बेटी पढाओ’, भारत स्वच्छता मिशन यांसारखे राज्य व राष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रम राबविणे, बाम्बे नर्सिंग होम रजिस्ट्रेशन ॲक्ट १९४९ व इतर आनुषंगिक कायद्यातील तरतुदीचे पालन आरोग्य संस्था करतात किंवा नाही,

याची पाहणी करून उचित कार्यवाही करणे, राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना, गरीब प्रवर्गातील नागरिकांसाठी असलेल्या योजनांची अंमलबजावणी खासगी रुणालयात होते किंवा नाही यावर नियंत्रण ठेवणे, आरोग्य संस्थांचा कायापालट करणे, रुग्णालयांना लागणारे वैद्यकीय अधिकारी कंत्राटी स्वरूपात उपलब्ध करून देणे. सध्या ही समिती नसल्याने वरील कार्य होत नसल्याचे चित्र आहे.

"जिल्हा आरोग्यसेवा समन्वय समितीची बैठक लवकरच होणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडे बैठकीसाठी वेळ मागितली आहे. राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना, गरीब प्रवर्गातील नागरिकांसाठी असलेल्या योजनांच्या अंमलबजावणीची तपासणी जिल्हाधिकारी स्तरावर सुरू असते." -डॉ. किरण पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक, जळगाव