Gas Cylinder Rate Hike : स्वयंपाकगृहातून निघतोय महागाईचा धूर; गृहिणी वळल्या चुलीकडे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Domestic and commercial LPG cylinder prices have seen huge hike in march jalgaon news

Gas Cylinder Rate Hike : स्वयंपाकगृहातून निघतोय महागाईचा धूर; गृहिणी वळल्या चुलीकडे

वावडे (जि. जळगाव) : महिन्याच्या सुरुवातीलाच सामान्य कुटुंबाला महागाईचा दुहेरी फटका बसला आहे. या महिन्यात एलपीजीच्या (LPG) घरगुती आणि व्यावसायिक सिलिंडरच्या (Gas Cylinder Rate Hike) किमतीत प्रचंड वाढ झाली आहे. (Domestic and commercial LPG cylinder prices have seen huge hike in march jalgaon news)

ऐन गुढीपाडवा सणाला जनतेला महागाईच्या तडाख्याला सामोरे जावे लागले आहे. गेल्या चार वर्षांत सिलिंडरच्या किमतीत केवळ वाढच झाली आहे. शासनाकडून नुकतीच घरगुती आणि व्यावसायिक सिलिंडरच्या दरात वाढ झाल्याने सर्वसामान्य कुटुंब आणि व्यवसायिकांच्या खिशाला महागाईचा चटका सहन करावा लागत आहे.

घरगुती गॅस सिलिंडरमध्ये ५० रुपयांची दरवाढ झाली असल्याने प्रत्येक कुटुंबीयांचे आर्थिक बजेटवर अतिरिक्त ताण वाढला आहे. केंद्र शासनाने ग्रामीण भागातील महिलांची चुलीच्या घरापासून मुक्तता व्हावी, या उद्देशाने प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेंतर्गत ग्रामीण भागात अनेक कुटुंबीयांना गॅस सिलिंडर जोडणीचा लाभ दिला.

मात्र, आता गॅस सिलिंडरच्या किमतीत ५० रुपये वाढ झाल्यामुळे ग्रामीण भागातील गृहिणी पुन्हा चुलीकडे वळल्याचे दिसून येत आहे.आधीच महागाईचा भडक्याने त्रस्त असलेले सर्वसामान्य नागरिक प्रत्येक वेळी जीवनावश्यक वस्तूंच्या किंमतीत वाढ होत असल्याने मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जात आहेत.

हेही वाचा : एका मुलाखतीतून उलगडलेले भैरप्पा!

व्यावसायिक वापराच्या सिलिंडरचे दर तब्बल ३५० रुपयांनी वाढल्याने बाहेरच्या खाद्यपदार्थांना सुद्धा भाववाढीचा सामना करावा लागत आहे. घरगुती गॅस सिलिंडरचे दर आता अकराशे ते बाराशे रुपयांच्या दरम्यान पोहोचले आणि महिला वर्गाकडून याबाबत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

लक्षणीय वाढ

अलीकडेच १४.२ किलोच्या घरगुती लिक्विड पेट्रोलियम गॅस सिलिंडरच्या किमतीत ५० रुपयांनी वाढ झाल्यानंतर सिलिंडरची किंमत ११०० रुपयापर्यंत पोहोचली आहे. गेल्या काही वर्षांत घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीत लक्षणीय वाढ झाली आहे. असे दिसून येते, की एलपीजीवरील एकूण सबसिडी गेल्या काही वर्षांत बंद सारखीच आहे.

"ग्रामीण भागातील अनेक महिला आता गॅसचा वापर फक्त चहा बनविण्यासाठी करीत आहेत. गॅस सिलिंडर व मिळणारी सबसिडी न मिळणारी सारखी झाली असल्याने ग्रामीण भागातील महिलांना बचत करणे अवघड होत चालले आहे." - विजया पाटील, गृहिणी, वावडे