
Eknath Khadse | गिरीश महाजन मुख्यमंत्री होत असतील तर पाठिंबाच : एकनाथ खडसे
जळगाव : सुरेशदादा जैन मुख्यमंत्री व्हावे, म्हणून मी बाळासाहेबांकडे शिफारस केली होती. माझा राजकीय शत्रू असला तरी चालेल.
मात्र, आपला भाग सुजलाम सुफलाम होण्यासाठी गिरीश महाजन (Girish Mahajan) यांना मुख्यमंत्री होण्यासाठी आपला नेहमीच पाठिंबा असेल, असे मत राज्याचे माजी मंत्री, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते व आमदार एकनाथ खडसे यांनी व्यक्त केले. (eknath khadse statement about girish mahajan cm jalgaon news)
राज्याचे ग्रामविकास मंत्री, भाजप नेते गिरीश महाजन व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आमदार एकनाथ खडसे एकेकाळी एकाच पक्षात होते. भारतीय जनता पक्षात असताना, ते एकमेकांचे चांगले मित्र होते. पक्षांतर्गत वादात दोघांचे बिनसले. त्यानंतर श्री. खडसे यांनी पक्ष सोडला. त्यानंतर दोघे आता एकमेकांचे कट्टर शत्रू झाले आहेत.
दोघेही एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. असे असतानाही आमदार एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजन मुख्यमंत्री होत असतील, आपला पाठिंबा राहील, असे विधान करून राजकीय क्षेत्रात खळबळ उडवून दिली आहे.
हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार
पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, की सुरेशदादा जैन मुख्यमंत्री व्हावेत, यासाठी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेतली होती. मला जो मुख्यमंत्री पाहिजे आहे, तो कार्यक्षम, दूरदृष्टीचा व सामाजिक हिताचा निकष पूर्ण करणारा पाहिजे असल्याचे मत त्यावेळी मी बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे व्यक्त केले होते.
आता याच निकषात गिरीश महाजन बसत असतील, तर मला त्यांच्या मुख्यमंत्रिपदासाठीही कोणतीही अडचण नाही. गिरीश महाजन यांनाही माझा पाठिंबा राहिलच. माझ्या भागाचा विकास व्हावा, हीच आपली अपेक्षा आहे.
परिसरात विद्यापीठ, पशुवैद्यकीय महाविद्यालयासह सिंचनासाठी निधी मिळावा व आपला परिसर सुजलाम सुफलाम व्हावा, यासाठी मी ही समर्थनाची भूमिका केव्हाही घ्यायला तयार आहे.