
Eknath Khadse : "माझ्यामागे ‘ईडी’ म्हणून महाजनांना मोक्का" एकनाथ खडसेंचा आरोप
Jalgaon News : गिरीश महाजन यांनी माझ्या मागे ‘ईडी’लावली म्हणून त्यांच्यामागे मोक्का लावण्यात आला. आज महाजन यांच्याकडे सत्ता आहे, त्याजोरावर ते दडपशाही करीत आहेत असा आरोप राज्याचे माजी मंत्री व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी केला आहे.
शेतकऱ्यांच्या कापसाला तसेच इतर शेतमालाला भाव मिळावा यासाठी राष्ट्रवादी कॉग्रेसतर्फे जामनेर येथे आंदोलन करण्यात आले, त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. (Eknath Khadse statement about girish mahajan MCOCA act jalgaon news)
श्री. खडसे म्हणाले, शेतकऱ्यांना न्याय देण्याची गरज आहे, परंतु या ठिकाणी तुमच्याविरुद्ध बोलायला लागले की, सूडाचे राजकारण करायचे, बोलणाऱ्यांच्या मागे इडी, सीबीआय लावायची अशा स्वरूपाच्या चौकशा करून दडपशाही करण्याचे धोरण सत्ताधारी राबवीत आहेत.
आमच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यामागेही इडी लावण्यात आली आहे. गिरीश महाजनांनी तर माझ्यामागे सर्वच यंत्रणा लावल्या आहेत आणि मला विचारतात माझ्यावर मोक्का का लावला? तुम्ही माझ्यामागे इडी लावली म्हणून तुमच्यावर मोक्का लावला, जर इडी आली नसती तर मोक्काही लावला नसता असे मतही त्यांनी व्यक्त केले. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे संजय गरुड आदी उपस्थित होते.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
मला आताही जप्तीची नोटीस
आपल्याला कालच जप्तीची नोटीस मिळाल्याचे श्री. खडसे यांनी सांगत दोन वर्षापूर्वी माझी प्रॉपर्टी ॲटेच करण्यात आलेली आहे. आता माझे काय जप्त करण्यात येणार आहे, हेच मला माहित नाही. माझा मोबाईल जप्त करणार की घर जप्त करणार आहे. न्यायालयातून ही नोटीस मला कालच मिळालेली आहे.
मी काय केले म्हणून कारवाई
माझ्यावर कारवाई का होत आहे, हे सुद्धा कळत नाही. मी काय चोऱ्या की उच्चक्या केल्या, कि फर्दापूरच्या रेस्ट हाऊसला गेलो, त्यावेळचे पेपर काढले तर सुरा आणि सुंदरी, मदिरा आणि मीनाक्षी यांचे किस्से ऐकायला मिळतील. अशा ठिकाणी आपण नव्हतो, परंतु अशा ठिकाणी आपले मंत्री महोदय असूनही त्यांच्यावर काहीच कारवाई होत नाही असा आरोपही त्यांनी केला.