Eknath Khadse : "गिरीश महाजन जिल्ह्यातील प्रकल्पही पूर्ण करा" एकनाथ खडसेंचा जोरदार हल्लाबोल | eknath khadse statement about girish mahajan not paid attention to completion of project jalgaon news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Eknath Khadse : "गिरीश महाजन जिल्ह्यातील प्रकल्पही पूर्ण करा" एकनाथ खडसेंचा जोरदार हल्लाबोल

Eknath Khadse : "गिरीश महाजन जिल्ह्यातील प्रकल्पही पूर्ण करा" एकनाथ खडसेंचा जोरदार हल्लाबोल

Jalgaon News : आपल्या मंत्रिपदाच्या काळात आपण अनेक प्रकल्प जळगाव जिल्हा व खानदेशसाठी मंजूर केले.

मात्र, गेल्या पाच वर्षांत युती सरकारने व शिंदे- फडणवीस (Shinde- Fadnavis) सरकारनेही हे प्रकल्प पूर्ण होण्याकडे लक्ष दिले नाही. त्यामुळे मोठे नुकसान होत आहे. एकप्रकारे खानदेशवर हा अन्यायच आहे. (eknath khadse statement about girish mahajan not paid attention to completion of project jalgaon news)

मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांच्या जवळचे आहेत. मात्र, ते केवळ बोलतात. अगदी त्यांच्या जामनेर भागासह जिल्ह्यातील कोणतेच प्रकल्प पूर्ण करण्याकडे त्यांनी लक्ष दिलेले नाही. त्यांनी हे प्रकल्प पूर्ण करून खानदेशला सुजलाम, सुफलाम करावे, असे मत आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी व्यक्त केले.

शिवरामनगरमधील निवासस्थानी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी उपस्थित होते.

श्री. खडसे म्हणाले, की आपण खानदेशासाठी स्वतंत्र कृषी विद्यापीठ मंजूर केले होते. सालबर्डी (ता. मुक्ताईनगर)येथे पशुवैद्यकीय महाविद्यालय मंजूर करून ६० एकर जागा दिली. पाल (ता. रावेर)येथे उद्यान विद्या महाविद्यालय मंजूर केले. त्यासाठी शंभर एकर जागा दिली.

हिंगोणा (ता. रावेर) येथे उती संवर्धन, टिश्‍यू कल्चर केळी रोपे प्रकल्पाला मंजुरी दिली. त्यासाठी जागाही दिली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

हिंगणे (ता. बोदवड) येथे तूर संशोधन केंद्र मंजूर केले. हतनूर येथे मत्सबीज प्रकल्प, भसावळ येथे कुक्कुटपालन, अंडी उबवनी केंद्र, चाळीसगाव येथे लिंबूवर्गीय फळ संशोधन केंद्र, वरणगाव येथे पोलिस प्रशिक्षण केंद्र, सालबर्डी येथे कृषी अवजारे केंद्र, हतनूर धरणातील गाळ वाहून जाण्यासाठी वाढीव सात गेटचे बांधकाम मंजूर केले.

जामनेर येथे टेक्सटाईल पार्क मंजूर केले. मात्र, आपण मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर तत्कालीन युती सरकारने आणि आताच्या शिंदे- फडणवीस सरकारने हे प्रकल्प पूर्ण होण्याकडे लक्ष दिले नाही. सरकारने हे प्रकल्प पूर्ण केले नाहीत. त्यातील काही प्रकल्प आता इतरत्र हलविले जात आहेत.

प्रकाशा, सारंगखेडा, सुलवाडे, शेळगाव बॅरेज, उपसा सिंचन योजना अपूर्ण आहेत. त्यामुळे आजही शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी मिळत नाही. शासन एकप्रकारे खानदेशवर अन्याय करीत आहे. आपण अखंड महाराष्ट्राच्या विचाराचे आहोत. अन्यायामुळे आपल्याला खानदेश वेगळा करण्याचा विचार बोलावा लागत आहे, अशा भावनाही त्यांनी व्यक्त केली.

महाजन नुसतेच बोलतात

राज्यातील सरकार व मंत्री गिरीश महाजन यांच्यावर त्यांनी जोरदार हल्ला चढविला. ते म्हणाले, की राज्यातील सरकार ढीम्म आहे. मंत्रीही निष्क्रिय आहेत. गिरीश महाजन तर विकासाबाबत नुसतेच बोलतात. प्रत्यक्षात ते कोणतेही काम करीत नाही.

त्यांनी जळगावला मेडिकल कॉलेज आणले. आपण त्यांचे स्वागत केले. त्याप्रमाणेच त्यांनी लक्ष देऊन हे प्रकल्प पूर्ण केले, असे छातीठोक सांगावे. केलेच नाही, तर त्यांची सांगण्याचीही हिंमत नाही. त्यामुळे सरकारने याकडे लक्ष देऊन हे प्रकल्प पूर्ण करावेत, असे अवाहनही श्री. खडसे यांनी केले.

२३ पत्रे देवून अवैध धंद्यावर कारवाई नाही

अवैध धंदे उघडपणे सुरू आहेत. पोलिस सर्रासपणे पैसे घेत आहेत. माझ्या ४० वर्षांच्या कारकिर्दीत जिल्ह्यात असा प्रकार पाहिला नाही. मी स्वत: जिल्हा पोलिस अधिक्षकांना कारवाई करण्याबाबत २३ पत्रे दिली आहेत. मात्र, एकावरही कार्यवाही झाली नाही. विधिमंडळात प्रश्‍न उपस्थित केला. राज्याच्या मंत्र्यांनीही कारवाईबाबत आदेश दिले नाहीत. अवैध धंद्याना आता उघड संरक्षण पोलिस आणि सरकारही देत असल्याचा आरोप त्यांनी केला.