
Employee Strike : संपामुळे रब्बी नुकसानीचे पंचनामे करण्यात अडचणी; संपाचा तिसरा दिवस!
जळगाव : राष्ट्रीय पेन्शन योजना (NPS) रद्द करून जुनी पेन्शन (OPS) योजना पूर्वलक्षी प्रभावाने लागू करावी आणि इतर मागण्यांसाठी जिल्ह्यातील विविध शासकीय विभागांतील सुमारे ४५ हजार कर्मचारी संपावर गेले आहेत. (employee strike old pension scheme Difficulties in assessing loss of Rabbi jalgaon news)
या संपाचा गुरुवारी (ता. १६) तिसरा दिवस होता. गुरुवारीही कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून घोषणाबाजी केली. संपात कृषी विभागाचेही कर्मचारी सहभागी झाल्याने गेल्या दोन दिवसांपासून होत असलेल्या अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे कोण करणार, असा प्रश्न कृषी अधिकाऱ्यांसमोर उभा आहे.
संपामुळे कर्मचारी नसल्याने शासकीय कार्यालये ओस पडली आहेत. अधिकारी व होमगार्डद्वारे काही नित्याची काम करवून घेतली जात आहेत. असे असले, तरी प्रत्यक्ष कामकाज ठप्प असल्याने फाईल पेंडीगचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.
हेही वाचा : हिंडेनबर्ग अहवालात तथ्य की ते भारताविरुद्धचे कारस्थान?
गुरुवारीही कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘एकच मिशन जुनी पेन्शन’, ‘हमारी मांगे पुरी करो’, ‘कोण म्हणतं देणार नाही’, ‘घेतल्याशिवाय राहणार नाही’, ‘हम सब एक है’, ‘हमारी युनियन हमारी ताकद’, ‘राज्य कमचारी संघटनेचा विजय असो’, आदी घोषणा देत कर्मचाऱ्यांनी परिसर दणाणून सोडला होता.
राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना व राज्य सरकारी-निमसरकारी, शिक्षक-शिक्षकेतर जिल्हा परिषद महासंघ समितीच्या निर्णयानुसार विविध विभागांच्या संघटनांनी हा संप पुकारला आहे. जिल्हा उपनिबंधक कार्यालय, जिल्हा माहिती कार्यालय, मस्त्य विभाग, बांधकाम विभाग, जलसंपदा विभाग, भूमिअभिलेख कार्यालय, आरोग्य कर्मचारी, शिक्षक कर्मचारी संघटनेसह विविध संघटनांनी संपात सहभाग घेतला आहे.