Jalgaon News : मुख्य रस्त्यावर वाढतेय अतिक्रमण; कर्मचारी वाढवूनही ‘जैसे थे’ | Encroachment is increasing day by day on the main roads of city jalgaon news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jalgaon News : मुख्य रस्त्यावर वाढतेय अतिक्रमण; कर्मचारी वाढवूनही ‘जैसे थे’

Jalgaon News : मुख्य रस्त्यावर वाढतेय अतिक्रमण; कर्मचारी वाढवूनही ‘जैसे थे’

Jalgaon News : शहरातील मुख्य रस्त्यावर दिवसेंदिवस अतिक्रमण वाढत आहे. महापालिकेचा अतिक्रमण निर्मूलन विभाग त्यांना अभय देत आहे. मात्र, गल्लीबोळात कारवाई करून अधिकारी व जनतेच्या डोळ्यात धूळफेक करीत आहे. (Encroachment is increasing day by day on the main roads of city jalgaon news)

महापालिकेच्या अतिक्रमण विभागातर्फे कारवाई सुरू आहे. खेडी भागातील कोपऱ्यात, गणेश कॉलनीच्या टोकला, तर थेट महाबळ कॉलनीच्या खालच्या भागात, एमआयडीसीच्या कोणत्या तरी विंगमध्ये कारवाई केल्याचे दाखविले जात आहे. त्या ठिकाणी एखादं-दुसऱ्या टपरीवर कारवाई करून आम्ही कारवाई केल्याचा आव महापालिका अतिक्रमण निर्मूलन विभागातर्फे केला जात आहे.

मुख्य रस्त्यावर वाढते अतिक्रमण

शहरातील कोणत्याही मुख्य रस्त्यांवर हातगाड्या लागल्याचे दिसून येत आहे. अगदी टॉवर चौक ते नेहरू चौक रस्त्यावरही विक्रेत्यांची गर्दी असते. पुढे नेहरू चौक ते महाबळ कॉलनीच्या मुख्य रस्त्यावर गाड्या लागलेल्या असतात. रात्री तर या रस्त्यावर अगदी ‘जलसा’ दिसून येतो. रस्त्यावर खवय्यांची गर्दी असते.

चित्रा चौक ते गणेश कॉलनी रस्त्यावरचे अतिक्रमण सर्वांनाच दिसत आहे. मात्र, अतिक्रमण निर्मूलन विभागास ते कधीच दिसून येत नाही. या रस्त्यावर गोलाणी संकुलाजवळील हनुमान मंदिर, पुढे गणपती मंदिराजवळ तर फळ विक्रेत्यांचे मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण आहे. त्यावर कधीच कारवाई केली जात नाही. केवळ कारवाईचा दिखावा करून गाड्या सोडून दिल्या जातात.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

नंदिनीबाई शाळा चौकाला विळखाच

नंदिनीबाई शाळा चौकाला अतिक्रमणाचा विळखाच पडला आहे. याठिकाणी ऐन वळणार पाणीपुरी, वडापाव, शीतपेय, पावभाजी, तसेच चायनीज विक्रेत्यांच्या गाड्या सर्रास लागलेल्या असतात. विशेष म्हणजे हा वाहतुकीचा रस्ता आहे. हे अतिक्रमण वाहतूक पोलिस व महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाला कधीच दिसत नाही.

कर्मचारी वाढवूनही परिस्थिती ‘जैसे थे’

महापालिकेच्या अतिक्रमण विभागात कर्मचारी कमी असल्याचा बहाणा करण्यात येत होता. मात्र, आता कर्मचारी वाढवूनही अतिक्रमणावर कोणतीही कारवाई होताना दिसत नाही. विशेष म्हणजे कर्मचारी वाढविल्यावर आम्ही ‘फुले मार्केट’च्या अतिक्रमणावर कारवाई करू, असे सांगण्यात आले. मात्र, या विभागाचे अद्यापही फुले मार्केटमधील अतिक्रमणावर कारवाई करण्याचे धाडस होत नाही. प्रत्येक वेळी पोलिस बंदोबस्त मिळत नसल्याची ओरड करून त्याच्या आड दडण्याचा प्रयत्न महापालिकेचे अधिकारी करीत असल्याचे दिसत आहे.

उपायुक्त चाटे कारवाईसाठी बाहेर पडणार?

महापालिकेच्या अधिकाऱ्यांची खऱ्या अर्थाने जबाबदारी आहे. ते स्वत: कारवाईसाठी बाहेर पडले, तर कर्मचारीही कारवाई करतात. तत्कालीन उपायुक्त वाहुळे अतिक्रमण काढण्यासाठी स्वत: रस्त्यावर उतरत होते. मात्र, विद्यमान उपायुक्त गणेश चाटे यांच्याकडे अतिक्रमण निर्मूलनाची जबाबदारी आहे. मात्र, अद्यापही त्यांनी कोणतीही धडक कारवाई केल्याचे दिसून येत नाही. ते कारवाईसाठी केव्हा बाहेर पडणार, याकडे आता जळगावकरांचे लक्ष लागले आहे.