Sakal Exclusive : ‘TCS’ वाढल्याने विदेशी पर्यटन महागणार| Foreign tourism will become more expensive as TCS increases Jalgaon news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Travel

Sakal Exclusive : ‘TCS’ वाढल्याने विदेशी पर्यटन महागणार

Jalgaon News : देशांतर्गत पर्यटनाला चालना देण्यासाठी भारत सरकारने यंदाच्या १ जुलैपासून स्त्रोतावरील कर संकलन अर्थात टीसीएस या करात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. (Foreign tourism will become more expensive as TCS increases Jalgaon news)

१ जुलैपासून हा कर पाच टक्क्यांवरून थेट २० टक्के होणार आहे. त्यामुळे विदेशातील पर्यटन महाग होऊन देशातील पर्यटनस्थळांकडे नागरिकांचा कल वाढण्याची शक्यता आहे. २०२० व २०२१ या दोन वर्षांच्या कोरोना प्रभावित कालावधीत पर्यटनच काय, सामान्य प्रवासही बंद होता.

या दोन्ही वर्षांच्या काळात सर्वच व्यवहार ठप्प असल्याने अर्थचक्र थांबले होते. त्याचा सर्वाधिक परिणाम शिक्षण, उद्योग क्षेत्रावर झाला, तसा पर्यटनावरही झाला. परिणामी, देशांतर्गत व विदेशातील पर्यटन प्रभावित झाले होते.

गेल्यावर्षी चांगला प्रतिसाद

दोन वर्षांनी कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यानंतर गेल्या वर्षी २०२२ मध्ये विशेषत: उन्हाळी सुट्यांच्या काळात पर्यटन क्षेत्राने पुन्हा उभारी घेतली. देशभरातील पर्यटक देशांतर्गत व विदेशी पर्यटनाला निघाले. त्यामुळे पर्यटनाशी संबंधित सर्वच क्षेत्रांवर त्याचा सकारात्मक परिणाम झाला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

यंदाही विक्रमी पर्यटन होणार

भारतात साधारण एप्रिल, मे महिन्यात शाळा- महाविद्यालयांना उन्हाळ्याच्या सुट्या लागतात. या दिवसांत विशेषत: भारतीय नागरिक मोठ्या प्रमाणावर पर्यटनावर निघतात. यंदाही गेल्या वर्षाप्रमाणेच किंवा त्यापेक्षाही जास्त प्रमाणात पर्यटनाला चालना मिळणार असल्याचे संकेत आहेत. पर्यटनाची विविध टूर पॅकेजेस देणाऱ्या कंपन्यांनी त्याबाबत विश्‍वास व्यक्त केला आहे.

विदेशी पर्यटन महागणार

भारतातील पर्यटनस्थळांकडे भारतीयांचा कल वाढावा, देशांतर्गत पर्यटन वाढावे, शिवाय देशात परकीय गंगाजळी वाढावी, म्हणून केंद्र सरकारने स्त्रोतावरील संकलित (टीसीएस) कर वाढविला आहे. येत्या १ जुलैपासून हा कर पाच टक्क्यांवरून २० टक्के होणार आहे.

त्यामुळे विदेशी पर्यटन महागणार आहे. विदेशात जाताना आपण किती खर्च केला, विदेशी चलन किती प्रमाणात वापरले, किती वस्तू खरेदी केल्या, त्यासंबंधी खर्चाचा तपशील सरकारकडे प्राप्त होऊन त्यावर कर भरावा लागेल. त्यामुळे जुलैपासून विदेशी पर्यटन महागणार असल्याने देशांतर्गत पर्यटनाला चालना मिळणार आहे.

सध्या उत्तर भारताकडे कल

सध्या महिनाभरापासून देशांतर्गत पर्यटनात उत्तरेकडील राज्यांसह पूर्वोत्तर राज्यांकडे पर्यटकांचा कल वाढला आहे. उन्हाळ्यात नागरिक थंड हवेच्या प्रदेशांमध्ये जाणे पसंत करतात. त्यादृष्टीने जम्मू-काश्‍मीर, सिमला, कुलू-मनाली, हिमाचल, अरुणाचल प्रदेश यासह आसाम, उत्तराखंड आदी राज्यांमध्ये पर्यटकांची गर्दी होतेय. बद्रीनाथ, केदारनाथ या तीर्थस्थळांकडेही पर्यटकांचा ओढा आहे.

हॉटेलिंग, प्रवास झाला महाग

दोन वर्षे कोरोनात वाया गेल्यानंतर आता गेल्या वर्षापासून पर्यटनाचे प्रमाण वाढले आहे. स्वाभाविकत: उन्हाळ्यात पर्यटनस्थळांना होणारी गर्दी पाहाता सर्वच सेवा सुविधांचे दर वाढले आहेत. प्रवास, तसेच हॉटेलिंगचे दर वाढले असून, ते सामान्यांच्या आवाक्याबाहेर जात आहेत.

"देशांतर्गत पर्यटन वाढले पाहिजे, म्हणून टीसीएस वाढीचा निर्णय योग्य आहे. मात्र, विदेशातही सामान्य पर्यटकांना जाता यावे, म्हणून काही सवलती द्यायला हव्यात. सध्या पर्यटनाचा सीझन असून, त्याला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय." -समीर देशमुख, संचालक, नेचर टूर्स, जळगाव/नाशिकसध्या उत्तर भारताकडे कल

टॅग्स :TravelJalgaontaxTourism