
Jalgaon Crime : गरजूंसाठी कर्ज मंजूर करून आणतो, असे सांगत शहरातील पराग प्रभाकर भावसार व त्यांच्या सहकाऱ्यांकडून प्रोसेसिंग फी म्हणून साडेसहा लाखांची रक्कम घेत फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे.
या प्रकरणी भूषण अविनाश भावसार असे नाव सांगणाऱ्याविरुद्ध रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. (fraud of six and a half lakhs by saying that would get loan jalgaon crime news)
मू. जे. महाविद्यालयाच्या मागे राहणारे पराग भावसार खासगी नोकरी करतात. त्यांना भूषण भावसार असे नाव सांगून एका व्यक्तीने भेट घेत आपण गरजू व्यक्तींना कर्ज मंजूर करून देतो, असे सांगितले.
त्यावर विश्वास ठेवत पराग भावसार यांनीही कर्ज हवे असल्याचे सांगितल्याने त्यांच्याकडून व त्यांच्या सहकाऱ्यांकडून भूषण नावाच्या व्यक्तीने वेळोवेळी प्रोसेसिंग फीच्या नावाखाली एकूण सहा लाख ५० हजार रुपये घेतले.
कर्जही मिळाले नाही आणि पैसे परत मिळत नाही म्हणून त्यांनी वारंवार विचारणा केली. मात्र फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पराग भावसार यांनी रामानंदनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून भूषण भावसारविरुद्ध २१ सप्टेंबरला गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास हेडकॉन्स्टेबल प्रशांत पाठक करीत आहेत.