Jalgaon Fraud Crime : केंद्र सरकारच्या नावे फसवणुकीचा धंदा; मस्कावदच्या संस्थेविरुद्ध गुन्हा दाखल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Fraud crime

Jalgaon Fraud Crime : केंद्र सरकारच्या नावे फसवणुकीचा धंदा; मस्कावदच्या संस्थेविरुद्ध गुन्हा दाखल

जळगाव : केंद्र शासनाच्या योजनेंतर्गत प्राप्त अनुदानांतून नवा कोरा लॅपटॉप (Laptop) मिळवून देण्याचे आमिष दाखवत सामाजिक संस्था, क्लासेस सहित ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गंडविल्याचा प्रकार समोर आला आहे. (Fraudulent business on behalf of Central Govt case registered against organization of maskawad in police station jalgaon news)

गोलानी मार्केटमधील एका संस्थेतील तीन विद्यार्थ्यांकडून सत्तर टक्के रक्कम लाटून त्यांची फसवणूक केल्याप्रकरणी मस्कावद (ता. रावेर) येथील संस्थेचा अध्यक्ष किरण फेगडे व रोहन फेगडे यांच्याविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. संशयितांनी अनेकांची फसवणूक केली असावी, असा संशय आहे.

विविध विद्याशाखेत शिक्षण घेणाऱ्या गोरगरीब आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना केंद्रशासनाच्या अनुदानातून आणि आपल्या संस्थेच्या मार्फत कमी खर्चात नवा कोरा लॅपटॉप मिळवून देत असल्याची येाजना मस्कावद (ता.रावेर) येथील पुष्पाताई मुरलीधर फेगडे फाउंडेशनतर्फे राबवण्यात येत असल्याचे अध्यक्ष किरण फेगडे यांनी तक्रारदार समाजसेविका चित्रलेखा मालपाणी यांना सांगितले होते.

ठरल्याप्रमाणे सुरवातीला तीन विद्यार्थ्यांना लॅपटॉप देण्यातही आले. म्हणून एका मागून एक अनेक विद्यार्थ्यांची लॅप टॉपसाठी मागणी होती. त्यापैकी जे खरोखर गरीब, गरजू आहेत, अशा विद्यार्थ्यांसाठी चित्रलेखा मालपाणी यांनी प्रयत्न करून संबंधित संस्थेत २ विद्यार्थी व एका ग्रामीण विद्यार्थिनीच्या नावे अर्ज फिलप करून सत्तर टक्के रक्कम प्रत्येकी, ३० ते ३५ हजार रुपये बँकेद्वारे संबंधितांच्या खात्यात वर्ग करण्यात आली होती.

हेही वाचा : कॅशबॅक किंवा खरेदीवर सूट मिळणारंच कार्ड निवडा...

पैसे मिळाल्यानंतर पंधरा दिवसात मिळेल, दहा दिवसात मिळेल, अशा तारखा देत टाळाटाळ करण्यात येत असल्याने संबंधित विद्यार्थ्यांनी तगादा लावला आणि शहर पोलिस ठाण्यात तक्रारी अर्ज करण्यात आला होता.

पोलिसांनाही चकविले

तक्रार अर्ज प्राप्त झाल्यावर शहर पोलिसांनी मस्कावद येथील पुष्पाई फाउंडेशनचे किरण व रोहन फेगडे यांना चौकशीसाठी बोलावले. पोलिस ठाण्यात आल्यावर दोघांनी आपण घेतलेले पैसे परत करू, असे सांगून पोलिसांना २ डिसेंबर ०२२ रोजी देतो, असे सांगितले होते.

पोलिस ठाण्यात पैसे देण्याचे मान्यकरूनही संबंधित विद्यार्थ्यांना त्यांचे ८५ हजारांची रक्कम परत देत नसल्याने अखेर आज (ता.१) शहर पोलिस ठाण्यात पुष्पाई फाउंडेशनचे किरण मुरलीधर फेगडे व रोहन महेंद्र फेगडे यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.