पाडळसरे धरणाला मिळणार 135 कोटी 

पाडळसरे धरणाला मिळणार 135 कोटी 

अमळनेर : अमळनेर मतदारसंघात भरघोस निधी महाविकास आघाडी सरकारने दिला असून पाडळसरे धरणाला 135 कोटी तर सर्व शासकीय कार्यालयांची असलेल्या प्रशासकीय इमारतीसाठी 14 कोटी 17 लाख रूपये दिले आहेत. जलसंधारणासाठी 12 कोटी रुपये मिळाले असून विविध रस्त्यांसाठी 25 कोटी रुपयांचा निधी प्रस्तावित झाला आहे. त्यामुळे राज्य शासनाने अमळनेर मतदारसंघाला न्याय दिल्याची माहिती आमदार अनिल पाटील यांनी दिली आहे.

 विधानसभा निवडणूक प्रचार सभेत जयंतराव पाटील यांनी "तुम्ही अमळनेर मतदारसंघात आमचा आमदार द्या मी अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या पाडळसरे प्रकल्पाला निधी उपलब्ध करून देईल" असा जाहीर सभेत यांनी शब्द दिला होता. त्याप्रमाणे त्यांनी या धरणाची पाहणी करून निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमदार अनिल पाटील यांना दिलेल्या शब्दाप्रमाणे या अर्थसंकल्पात 135 कोटी इतका विक्रमी निधी दिला. या धरणाच्या आजच्या 25 वर्षांच्या काळात प्रथमच एवढा मोठा निधी मिळाला आहे. त्यामुळे आमदार अनिल पाटील यांनी सतत अवर्षणप्रवण असलेल्या तालुक्याला महाविकास आघाडीने भरघोस निधी दिल्यामुळे महाविकास आघाडीच्या सरकार आभार मानले आहे. 

चोवीस तास पाणी मिळणार

लवकरच आयआयटी कडून संकल्प चित्र मंजूर करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू झाले आहेत लवकरच ते चित्रही मिळेल प्रत्यक्षात नदी पात्रातील कामांना सुरुवात झाल्यावर पाणी साठा वाढणार आहे विहिरींची पाणी पातळी वाढून त्यामुळे सिंचन क्षमता वाढेल, आपोआपच बागायती क्षेत्रात वाढ होऊन  शेतकऱ्यांना दुबार किंवा तिबार पिके, उत्पन्न  घेता येणार आहे. शेती क्षेत्रातील प्रगती होऊन इतर किरकोळ उद्योगांना चालना मिळणार आहे, लांब अंतरापर्यंत बॅकवॉटर थांबल्याने पाणी टंचाईवर देखील मात करता येणार आहे. भविष्यात अमळनेर शहराला 24 बाय 7 पाणीपुरवठा होण्यासाठी त्याचा उपयोग होणार आहे. भरघोस निधी मिळाल्यामुळे महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंद संचारला आहे.

प्रशासकीय कार्यालया इमारतीला मिळाली मंजूरी

 सर्व प्रशासकीय कार्यालये एकाच छताखाली यावे या दृष्टीकोनातून अमळनेर तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालयांच्या प्रशासकीय इमारतीसाठी 14 कोटी 17 लाख रुपये निधीस अर्थसंकल्पात मंजुरी दिली आहे. यामुळे आता एकाच ठिकाणी ही इमारत बांधकाम सुरू होणार आहे. जलसंधारणासाठी अमळनेर मतदारसंघात 12 कोटी रुपये मिळाल्याने मतदारसंघातील उपेक्षित नाले, ओढ्यांवरील विविध लघु बंधारे, छोटे बंधारे यांच्यासाठी 12 कोटी रुपये प्राप्त झाले आहेत. यामुळे मतदारसंघातील जलसिंचन वाढणार आहे. व अवर्षणप्रवण तालुक्याला याचा फायदा होणार आहे. 

रस्त्यांचे जाळे देखील वाढणार

मतदारसंघातील रस्त्यांचे जाळे वाढावे या दृष्टीकोणामुळे विविध रस्त्यांसाठी 25 कोटी रुपयांचा निधी प्रस्तावित झाला आहे. यामुळे दळणवळण सोपे होण्यास मदत होणार असून नागरिकांना सुसह्य प्रवास करता येणार आहे. दरम्यान  प्रलंबित कामांसाठी सतत आमदार अनिल पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, माजी विधानसभा अध्यक्ष नानासाहेब पटोले यांच्याकडे पाठपुरावा केला होता.

संपादन- भूषण श्रीखंडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com