
Jalgaon Crime News : गँग्स् ऑफ गेंदालालमील’चे तिघे हद्दपार; गुन्हेगारीवर पोलिस अधीक्षकांचा जालीम उपाय
जळगाव : सामान्य नागरिकांना त्रास नको, गुन्हेगारीवर वचक राहून कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांनी गेल्या तीन महिन्यांत तीन हजारांवर जणांना तडीपार केले आहे. ८ जणांना स्थानबद्धता (एमपीडीए) आणि दोन टोळ्यांवर मोक्का लावला आहे.
जळगाव जिल्ह्यात पोलिस अधीक्षकांनी आपल्या कामांची छाप वेगळ्या शैलीतून पाडली. तत्कालीन पोलिस अधीक्षक नवल बजाज, प्रवीण साळुंखे, संतोष रस्तोगी, चंद्रकांत कुंभार, एस. जयकुमार,अप्पर अधीक्षक इशू सिंधू, डॉ. पंजाबराव उगले, डॉ. प्रवीण मुंडे यांच्यासारख्या कर्मठ अधिकाऱ्यांनी जिल्ह्यात हटके पोलिसिंगचा पायंडा रूजवला.
डॉ. प्रवीण मुंडे यांची बदली झाल्यानंतर नव्या दमाचे एम. राजकुमार यांनी पदभार स्वीकारला. रूजू झाल्याच्या पहिल्याच दिवशी प्रतिबंधक कारवाईचा मूलमंत्र त्यांनी दिला. गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्यासाठी प्रतिबंधात्मक कारवाई, हद्दपारी, स्थानबद्धता आणि गरज पडल्यास मोक्कासारख्या प्रभावी उपाय अंमलात आणून जिल्ह्यातील गुन्हेगारांना धडकी भरविण्यात ते यशस्वी झाले.
टार्गेटबेस कारवाई
कारागृहातून जामिनावर सुटलेल्या प्रत्येकावर त्यांनी प्रतिबंधात्मक कारवाईसह सराईत गुन्हेगारांना थेट जिल्ह्यातूनच तडीपार करण्याचा सपाटाच लावला. पोलिस ठाण्यानिहाय हद्दपारीचे टार्गेट अधिकाऱ्यांना दिले.
त्यासाठी गुन्हे शाखेत स्वतंत्र कक्षच उघडला आहे. तेथे एक अधिकारी, पाच कर्मचारी कार्यरत आहेत. दोन टोळ्यांना मोक्का, एमपीडीएच्या पंधरापैकी ८ प्रस्ताव मंजूर झाले आहेत. दोन प्रतिक्षेत आहेत, तर हद्दपारीची कारवाई दिवसाआड सुरू आहे.
जिल्हा प्रशासनाला बायपास
एम. राजकुमार यांनी पदभार घेतला, त्यावेळेस हद्दपारीचे १३५ प्रस्ताव प्रलंबित होते. त्यांचा पाठपुरावा करूनही उपयोग होत नसल्याने पोलिस अधीक्षकांनी त्यांच्या अधिकारातच महाराष्ट्र पोलिस कायदा कलम ५५, ५६ आणि ५७ प्रमाणे १५ तडीपार प्रस्ताव मंजूर केले. प्रतिबंधात्मक कारवाईत साडेतीन हजारांचा पल्ला स्थानिक गुन्हे शाखेने गाठला आहे.
आता पोलिसिंगच्या अपेक्षा
वाढत्या गुन्हेगारीसेाबतच घरफोड्या, दरोडे, वाहन चोरी, मंगळसूत्र चोरी या गुन्ह्यांसाठी प्रत्येक पोलिस ठाण्यानिहाय हरकत होणे गरजेचे आहे. पोलिस ठाण्यानिहाय नियमित गस्तीवर प्रभाव हवा. नागरी वस्त्यांसह मुख्य रस्त्यांवर टवाळखोरी करणारे, भुरटे यांना पोलिस दिसायला हवेत, उपद्रवींवर कारवाई होते, याची जाणीवच राहिलेली नाही. पोलिस फिरता राहिला, तर जनसामान्यांना धीर मिळेल.