Girish Mahajan : कापसाच्या भावाबाबत 15 दिवसात निर्णय : गिरीश महाजन | girish mahajan statement about cotton rate jalgaon news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Girish Mahajan

Girish Mahajan : कापसाच्या भावाबाबत 15 दिवसात निर्णय : गिरीश महाजन

Jalgaon News : कापूस दराबाबत शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे, शेतकऱ्यांच्या घरात अजूनही कापूस पडून आहे, ही अत्यंत गंभीर बाब आहे. भाव वाढवून देण्याबाबत आपण कॅबीनेटमध्येही प्रश्‍न उपस्थित केला होता. (girish mahajan statement about cotton rate jalgaon news)

केंद्रांकडे त्याचा पाठपुरावा सुरू आहे. त्यामुळे येत्या पंधरा दिवसांत कापूस दराबाबत निर्णय होईल. असे मत राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केले. दरम्यान, जळगाव येथे येत्या दोन महिन्यात पोलीस आयुक्तालय करण्यात येईल अशी ग्वाहीही त्यांनी पत्रकार परिषदेत दिली.

भारतीय जनता पक्षाच्या केंद्रांतील सरकारला व नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाला नऊ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल त्यांच्या कामाची माहिती देण्यासाठी भाजप कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत श्री. महाजन बोलत होते.

आमदार रणधीर सावरकर, खासदार उन्मेश पाटील, आमदार सुरेश भोळे, माजी आमदार स्मिता वाघ, महानगराध्यक्ष दिपक सूर्यवंशी, नगरसेवक विशाल त्रिपाठी, मनोज भांडारकर आदी या वेळी उपस्थित होते. श्री. महाजन म्हणाले, कि जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारी घटना लक्षात घेता, जिल्ह्यात पोलीस आयुक्तालय उभारण्याबाबत आपण आग्रही आहोत. त्यासाठी आपण शासनाकडे पाठपुरावाही करीत आहोत. त्याला लवकरच मंजूरी मिळून येत्या दोन महिन्यात जिल्ह्यात पोलीस आयुक्तालय उभारण्यात येईल.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

कापसाबाबत पाठपुरावा

कापूस दराबाबत महाजन म्हणाले, कि कापसाला दर नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठी नाराजी आहे. अनेक शेतकऱ्यांच्या घरात कापूस पडून आहे. ही अत्यंत गंभीर बाब आहे. आपण याकडे लक्ष देवून आहोत. कॅबीनेटमध्येही याबाबत प्रश्‍न उपस्थित केले आहेत. केंद्राकडेही पाठपुरावा करीत आहोत. येत्या पंधरा दिवसात निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

वाळू चोरांवर कारवाईचे आदेश

वाळू सर्वसामान्य जनतेला रास्त दरात मिळण्याबाबत शासनाने पावले उचलली आहेत. दुसरीकडे अद्यापही वाळू चोरी होतेय. त्याच्यावर आळा घालण्यासाठी उपाय करण्यात येत आहेत. वाळूचोरावर कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. जिल्ह्यातील सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी निधी उपलब्ध करण्यात आला आहे.

बोदवड उपसा सिंचनाचे काम सुरू होणार आहे. वाघूर धरणाच्या कामासाठी निधी मंजूर झाला आहे. शेळगाव बॅरेजच्या कामासाठी निधी मंजूर होवून त्याचे कामही सुरू झाले आहे. जिल्ह्यात सिंचनाची कामे वेगाने सुरू असल्याची माहितीही त्यांनी दिली.

स्टेडीयमसाठी हवी जागा

जळगाव येथे भव्य स्टेडीयम उभाण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली. ते म्हणाले कि, स्टेडीयम उभारणीसाठी २५ कोटी रूपये मंजूर करण्यात आले आहेत. त्यासाठी २५ एकर जागेचा शोध सुरू आहे. या शिवाय शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडीयमच्या कामासाठीही निधी मंजूर करण्यात आला आहे.

खेळाडूंचे आंदोलन

दिल्लीतील कुस्ती खेळाडूंच्या आंदोलनाबाबत बोलताना महाजन म्हणाले, दिल्लीतील कुस्ती खेळाडूंचा प्रश्‍न अत्यंत गंभीर आहे. ही बाब अत्यंत गुंतागुतीची झालेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा त्यात लक्ष घालून चौकशी करतील. पंतप्रधान मोदी यांचे गेल्या नऊ वर्षातील कामही अत्यंत चांगले आहे. जनताभिमुख निर्णय त्यांनी घेतले असल्याची माहितीही त्यांनी दिली.

भाजपतर्फे जनसंपर्क अभियान : आमदार सावरकर

दरम्यान, भाजपचे आमदार रणधीर सावरकर म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्रातील सरकारला नऊ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल ३१ मे ते ३० जूनपर्यंत जनसंपर्क अभियान राबविण्यात येणार आहे. या अंतर्गत घरोघरी जावून जनतेला केंद्रातील सरकारच्या कामाची माहिती देण्यात येईल. भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते हे जनसंपर्क अभियान राबवतील.