Diwali Holiday : ‘दिवाळी फीव्हर’ने शासकीय कार्यालये ओस; कर्मचारी बाहेरगावी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

empty office

Diwali Holiday : ‘दिवाळी फीव्हर’ने शासकीय कार्यालये ओस; कर्मचारी बाहेरगावी

जळगाव : यंदाच्या वर्षी तिथींच्या मिलाफाने प्रत्यक्ष दिवाळीचे दिवस कमी झाले असले, तरी याआधीच्या आठवड्याचा वीकेंड आणि या आठवड्यातील दोन सुट्यांचे ‘प्लॅनिंग’ करून शासकीय अधिकारी-कर्मचारी बाहेरगावी निघाले. त्यामुळे एकीकडे शासकीय कार्यालयांमध्ये ‘दिवाळी फीव्हर’ने शांतता आहे, तर दुसरीकडे सोमवारी सुटी अनुभवल्यानंतर बुधवारी पाडव्याची सुटी घेऊन बँक कर्मचारी गुरुवारी बँक कार्यालयांमध्ये परतणार आहेत.

यंदाच्या दीपोत्सवात धनत्रयोदशी विविध भागांत त्या-त्या रचनेनुसार दोन दिवस साजरी झाली. नरक चतुर्दशी व लक्ष्मीपूजन एकाच दिवशी आले, तर बुधवारी दिवाळी पाडवा आणि भाऊबीजही एकाच दिवशी येत आहे. तिथींच्या एकत्रित आल्यामुळे यंदा प्रत्यक्ष दिवाळीचे दिवस कमी झाले असले, तरी नागरिकांचा उत्साह मात्र अजिबात कमी झालेला नाही. (government offices empty as Employees leave on festival days Jalgaon News)

हेही वाचा: Diwali Travel : माहेरवाशीनींची बसस्‍थानकावर गर्दी; खानदेशासाठी सर्वाधिक प्रवासी

सुट्यांचे नियोजन

गेल्या आठवड्यातील वीकेंडला शनिवार, रविवारची सुटी व या आठवड्यात सोमवारी लक्ष्मीपूजन आणि बुधवारचा पाडवा अशा दोन शासकीय सुट्यांचे दिवस आले. त्यातही जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिकारात घोषित मंगळवारही सुटीचा दिवस होता. त्यामुळे विशेषत: राज्य शासकीय कार्यालयांमध्ये सलग पाच दिवसांच्या सुट्या मिळाल्याने अधिकारी-कर्मचाऱ्यांनी बाहेरगावी जाण्याचे नियोजन करून ठेवले. गुरुवारपासून नियमितपणे कार्यालये सुरू होत असली तरी हा आठवडा दिवाळीचा फीव्हर कायम राहणार असल्याने कार्यालये संपूर्ण आठवडाभरच ओस असतील, असे दिसते.

बँका गुरुवारी होणार सुरू

बँकांना मात्र सोमवारी लक्ष्मीपूजनाची सुटी होती. आता बुधवारी (ता. २६) पाडव्याची सुटी असल्याने त्यांचे सलग सुट्यांचे नियोजन चुकले. तरीही काही कर्मचाऱ्यांनी मधली मंगळवारची रजा घेत सलग चार सुट्या कशा मिळतील, याचे प्लॅनिंग करून ठेवले होतेच.

केंद्रीय कर्मचाऱ्यांनीही गेल्या शनिवारपासून बुधवारपर्यंतच्या सुट्यांचे नियोजन करून बाहेरगावी जाण्याचे नियोजन करून ठेवले. दिवाळीला नातलगांकडे जाण्यासाबेतच कुटुंबासह पर्यटनाला जाण्याकडेही अलीकडच्या काळात कल वाढतोय. त्यामुळे येणाऱ्या दोन-चार दिवसांत पर्यटनस्थळीही गर्दी होण्याची शक्यता वर्तविली जातेय.

हेही वाचा: Surya Grahan 2022 : जप-तप अन् गोदापात्रात अंघोळ..!; भाविकांची रामकुंडावर गर्दी