ग्रामपंचायत निवडणूक : पहिल्या दिवशी एकही अर्ज दाखल नाही, प्रमाणपत्रांसाठी धावपळ 

देविदास वाणी
Wednesday, 23 December 2020

 निवडणूक अर्ज भरण्याच्या पहिल्या दिवशी एकही उमेदवारी अर्ज दाखल झालेला नाही. उमेदवारी अर्ज, विविध प्रमाणपत्रांची जमवाजमव करण्यासाठी इच्छुकांची दमछाक होताना दिसले.

 

जळगाव : जिल्ह्यातील सुमारे ७८३ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीची रणधुमाळी आज (बुधवार) पासून सुरू झाली. निवडणूक अर्ज भरण्याच्या पहिल्या दिवशी एकही उमेदवारी अर्ज दाखल झालेला नाही. उमेदवारी अर्ज, विविध प्रमाणपत्रांची जमवाजमव करण्यासाठी इच्छुकांची दमछाक होताना दिसले.

सर्वच तहसील कार्यालयांत उमेदवारी अर्ज भरण्यासाठी गर्दी होणार म्हणून कार्यालयाच्या २०० मीटर परिसरात बॅरिकेडिंग करण्यात आले. पोलिस बंदोबस्तही ठेवण्यात आला होता. जिल्ह्यातील ७८३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी १५ जानेवारीस मतदान होणार आहे. 

निवडणूकप्रक्रियेसाठी तहसील कार्यालयात ४३ ठिकाणी गावाचे नाव लिहून टेबलांची मांडणी करण्यात आली. निवडणुकीचे अर्ज ग्रामपंचायतनिहाय स्वीकारले जाणार आहे. 

जळगाव तालुक्यात ४३ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत. त्यात शिरसोली प्रबो, शिरसोली प्र.न., नशिराबाद, जळगाव खुर्द, कुसुंबा, चिंचोली, रायपूर, कंडारी, असोदा, आव्हाणे, ममुराबाद, फुफनगरी, रामदेववाडी, तरसोद, मन्यारखेडे, उमाळा, वडनगरी, भादली बुद्रुक, कडगाव, भोकर, कठोरा, आवार, सावखेडा बुद्रुक, लमांजन प्रबो, रिधूर, आवार, शेळगाव, म्हसावद, वडली, मोहाडी, वावडदे, जवखेडे आदींचा समावेश आहे. 

आकडे बोलतात 
एकूण निवडणुका असलेल्या ग्रामपंचायती - ४३ 
प्रभागसंख्या--१६८ 
मतदान केंद्रे-२०९ 
निवडून द्यावयाचे उमेदवार -- ४६३ 

अर्ज भरताना १६ कागदपत्रे गरजेची 
निवडणूक अर्ज ऑनलाइन भरावा लागेल. त्याची प्रिंट काढून तहसील कार्यालयात द्यावी लागेल. मतदारयादीत उमेदवाराचे नाव ज्या पानावर आहे त्या पानाची सत्यप्रत, अनामत रकमेची पावती (राखीवसाठी १०० रुपये, सर्वसाधारणसाठी ५०० रुपये), राष्ट्रीयीकृत बँकेत खाते उघडून त्याची छायांकित प्रत, मालमत्ता, दायित्व घोषणापत्र, हयात अपत्ये दोनपेक्षा अधिक नसल्याबाबत उमेदवारांचे स्वघोषणापत्र, जातप्रमाणपत्र, रोजचा खर्च सादर करण्याबाबत हमीपत्र, उमेदवाराचे वय २१ वर्षे पूर्ण असल्याबाबत प्रमाणपत्र, आधारकार्डाची झेरॉक्स, थकबाकीदार नसल्याचे प्रमाणपत्र, ग्रामपंचायत ठेकेदार नसल्याचे प्रमाणपत्र, शौचालय असल्याचे प्रमाणपत्र, शौचालय वापरत असल्याबाबत ग्रामसभेतील ठराव मंजुरीची प्रत आदी. 

निवडणूक कार्यक्रम 
अर्ज दाखल करणे ः २३ ते ३० डिसेंबर 
छाननी ः ३१ डिसेंबर 
अर्ज माघारी, चिन्हवाटप ः ४ जानेवारी २०२१ 
मतदान ः १५ जानेवारी 
मतमोजणी ः १८ जानेवारी 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: gram panchayat election news jalgaon not application candidate