
Jalgaon News : बचत गटाच्या वस्तूंसाठी नवतेजस्विनी उपयुक्त; प्रदर्शनाचे थाटात उद्घाटन
जळगाव : महिलांनी आपल्यातील सुप्त कला गुणांना वाव देऊन उद्योजक म्हणुन पुढे यावे, यासाठी त्यांनी बोलण्याचे कौशल्य आत्मसात करावे. बचत गटातील महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तुंना बाजारपेठ उपलब्ध होण्यासाठी नवतेजस्विनी प्रदर्शन उपयुक्त ठरेल, असे प्रतिपादन महापौर जयश्री महाजन यांनी केले.
महिला आर्थिक विकास महामंडळाच्या (माविम) जिल्हा कार्यालयातर्फे नवतेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्पांतर्गत बचत गट उत्पादित वस्तूंच्या जिल्हास्तरीय प्रदर्शनाचे उद्घाटन महापौर महाजन, जिल्हाधिकारी अमन मित्तल यांच्या हस्ते झाले. त्यावेळी त्या बोलत होत्या.
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर, ‘आत्मा’चे उपसंचालक कुर्बान तडवी, अग्रणी बँकेचे व्यवस्थापक अरुण प्रकाश, नाबार्डचे जिल्हा विकास प्रबंधक श्रीकांत झांबरे, कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. हेमंत बाहेती, मानवविकास समितीचे जिल्हा नियोजन अधिकारी मनोहर चौधरी, योगेश चौधरी, सारस्वत बँकेचे शाखा व्यवस्थापक राकेश सुतावणे, संपदा पाटील आदी उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांनी वस्तुंच्या स्टॉलला भेट देऊन महिलांसोबत संवाद साधला. श्री. झांबरे यांनी बचत गटाच्या चळवळीतील नाबार्डच्या योगदानाबाबत माहिती दिली. कुर्बान तडवी यांनी प्रधान मंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उन्नयन योजनेची माहिती दिली. माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी उल्हास पाटील यांनी प्रास्ताविक केले. प्रशांत पाटील यांनी आभार मानले.
प्रदर्शनात विविध पदार्थांचे ६० स्टॉल लावले आहेत. यात खानदेशी मसाले, तांदूळ पापड, नागली पापड, बिबड्या, कुरड्या, लोणचे, केळी वेफर्स, केळी कुकीजव, बिस्किट, गारमेंट, हस्तकला वस्तूंमध्ये लाकडी बैलगाडी, शोभेच्या वस्तू, तोरण विक्रीसाठी उपलब्ध आहेत. खाद्यपदार्थांचे स्टॉलही लावण्यात आले आहेत.
आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्षानिमित्त तृणधान्याचे महत्त्व सर्वसामान्यांना कळावे, यासाठी ममुराबादच्या कृषी विज्ञान केंद्राने ज्वारी, बाजरी, नाचणी, राजगिरा याची माहिती देण्यासाठी स्वतंत्र स्टॉल लावला आहे.