ग्रामपंचायत निवडणूका आल्या रंगात; भावी सरपंचांचा आखाडा तापला !

अमोल महाजन  | Friday, 1 January 2021

सरपंचपदाचे आरक्षण कोणते पडणार याची खात्री देता येत नाही. खुल्या जागेवरील सरपंचपदासाठी कोणत्याही प्रवर्गातील व्यक्ती चालते.

धानोरा (ता. चोपडा) : ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी १५ जानेवारीला मतदान होणार आहे. चोपडा तालुक्यात एकूण १३२१ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. ४ जानेवारीला दुपारी ३ वाजेपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत. तालुक्यात काही ठिकाणी रंगतदार लढती होणार असल्याने संपूर्ण तालुका ढवळून निघाला आहे. गावपातळीवरील राजकारण कडाक्याच्या थंडीतही चांगलेच तापले आहे. 

आवश्य वाचा-  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत निवडणूकांमध्ये प्रचारासाठी कोरोना नियमांचाच शब्दप्रयोग होत आहे.
 

ग्रामपंचायत निवडणूक निकालाची रंगत आता वाढली आहे. उमेदवारी अर्ज दाखल झाले असून आता माघारीसाठी खेळ्या खेळल्या जाणार आहेत. निवडणूक बिनविरोध करण्यासाठी काही ठिकाणी हालचाली सुरू आहेत. माघार घेण्यासाठी संबंधितांना गोड गोड बोलले जाईलही पण माघारीसाठी जो काही शब्द दिलेला आहे तो भविष्यात पाळला जाईलच याची खात्री कोण देणार? हा यक्ष प्रश्न संबंधितांना सतावत आहे. दरम्यान, ज्या गावात गेल्या काही पंचवार्षिकमध्ये सरपंचपद खुले आहे त्या ठिकाणी आरक्षित जागांसाठी रस्सीखेच दिसून येते आहे. 

Advertising
Advertising

माघारीकडे लक्ष 
उमेदवारी अर्ज मोठ्या संख्येने दाखल झाले असून आता माघार कोण कोण घेणार? याकडे लक्ष लागून राहिले आहे. काही ठिकाणी बंडखोरी झाली असून आघाड्या व पॅनेलचे गणित बिघडले आहे. बंडखोरी करणाऱ्यांना माघार घेण्यासाठी दबाव आणला जावू लागला आहे. काहीतरी अमिषे दाखवून निवडणूक लढवण्यापासून संबंधितांना माघार घ्यायला लावण्याचे प्रयत्न सुरु झाले आहेत. 

इच्छुकांचा हिरमोड 
सरपंचपद खुले असणाच्याठिकाणी यावेळी आरक्षण पडण्याची शक्यता गृहीत धरुन चाली खेळल्या जात आहेत. महाविकास आघाडीने अचानकपणे निवडणूक निकालानंतर सरपंच पदाची आरक्षणे जाहीर करण्याचा निर्णय घेतला. गावचे सरपंचपद मोठ्या सन्मानाचे असल्याने आपल्यालाच मिळावी म्हणून अनेक इच्छुकांचे देव पाण्यात आहेत.. परंतु, या निर्णयाने इच्छुकांचा हिरमोड झाला आहे. 

सरपंचपद अंधारात... 
पूर्वीचे चित्र उलटे होते. निवडणुकीपूर्वीच सरपंचपदाचे आरक्षण कळायचे. हे पद आरक्षित झाल्यास सरपंचसाठी निवडणूक लढवणारे व खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेले इच्छुक निवडणुकीतूनच माघार घ्यायचे. आता आरक्षणच अंधारात आहे. भविष्यात सरपंच पदरात पडेलच याची शाश्वती नाही. 

आवर्जून वाचा- मेहरूण तलावाजवळ वॉकिंग करण्यासाठी गेला. त्या वेळी तीन अनोळखी व्यक्ती अचानकपणे समोर येऊन एकाने दारूसाठी पैसे मागितले.

बिनविरोधच्या हालचालींना वेग 
सरपंचपदाचे आरक्षण कोणते पडणार याची खात्री देता येत नाही. खुल्या जागेवरील सरपंचपदासाठी कोणत्याही प्रवर्गातील व्यक्ती चालते. परंतु, सरपंच आरक्षित झाल्यास तेथे त्याच प्रवर्गातील सदस्य लागतो. प्रत्येक गट आपल्यालाच सरपंचपद मिळावे म्हणून आघाडी आणि बिनविरोधच्या रचनेत आरक्षित जागा अधिकाधिक आपल्याकडे ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. सरपंचपदाची सुप्त इच्छा मनात ठेवून डाव खेळले जात असल्याचे चित्र आहे.

 

संपादन- भूषण श्रीखंडे