Gudipadva Festival : गुढीपाडव्याच्या पार्श्‍वभूमीवर सोन्यात ‘3700’ ची उसळी! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Silver-Gold Rate

Gudipadva Festival : गुढीपाडव्याच्या पार्श्‍वभूमीवर सोन्यात ‘3700’ ची उसळी!

जळगाव : चार दिवसांवर येऊन ठेपलेला साडेतीन मुहूर्तांपैकी एक पूर्ण मुहूर्त असलेला गुढीपाडव्याचा सण बुधवारी (ता. २२) आहे.

त्या पार्श्वभूमीवर सोन्याच्या (Gold Rate) दरात प्रतितोळा तीन हजार ७००, तर चांदीच्या दरात प्रतिकिलो सहा हजारांची वाढ झाली आहे. १० ते १८ मार्च या अवघ्या आठ दिवसांतील ही वाढ आहे. (gudi padwa festival price of gold has increased by 3700 per tola price of silver has increased by 6000 per kg jalgaon news)

केंद्रीय अंदाजपत्रकानंतर सोन्यात ८०० ची, तर चांदीत तीन हजारांची वाढ झाली होती. नंतर मात्र सोन्यात एक हजार ५००, तर चांदीत चार हजारांनी घसरण झाली. दहा दिवसांपूर्वी सोने ५५ हजार ६०० (प्रतितोळे), तर चांदी ६३ हजारांवर (प्रतिकिलो) पोचले होते. आज सोन्याचा दर प्रतितोळे ५९ हजार ३०० (विनाजीएसटी), तर चांदीचा दर ६९ हजारांवर पोचला आहे.

गुढीपाडव्याला नवीन वर्षाचा पहिला दिवस म्हणून महिला आवर्जून सोने खरेदी करतात. या दिवशी सुवर्ण बाजारपेठेत मोठी गजबज असते. त्यामुळे संभाव्य वाढती मागणी, आंतरराष्ट्रीय स्तरावरील घडामोडींवर सोन्याचे भाव वाढलेले असल्याची माहिती सुवर्ण व्यावसायिकांनी दिली. केंद्रीय अंदाजपत्रकानंतर दुसऱ्याच दिवशी सोने, चांदीच्या दरात वाढ होऊन, सोने बाजारात उसळी आली होती. महिन्यानंतर मात्र सोन्यात एक हजार ५००, तर चांदीत चार हजारांनी घसरण झाली.

बजेटनंतर सोने, चांदीचे दर वाढतच जातील, असे चित्र होते. प्रत्यक्षात मात्र दहा दिवसांनंतरही सोन्याचे दर तसेच राहिले होते. चांदीच्या दरात मात्र तब्बल पाच हजारांची घसरण झाली होती. नवीन वर्षात सोने, चांदी बाजारात तेजीचे वातावरण आहे. जानेवारीत सोन्याच्या दरात पंधराशे रुपयांची, तर चांदीच्या दरात एक हजारांची वाढ झाली होती.

हेही वाचा : ही चाळीस वर्षे जुनी बलाढ्य बँक ४८ तासात बुडालीच कशी?

तेव्हा सोन्याचा दर जीएसटीसह प्रतितोळा ५८ हजार ८०० वर, तर चांदीचा दर जीएसटीसह प्रतिकिलो ७२ हजार १०० वर पोचला होता. शहरासह ग्रामीण भागातील महिलांचा कल सोने खरेदीकडे वाढत आहे. ग्रामीण भागातील अधिकतर महिलांचा सोने खरेदीकडे अधिक कल असतो, तो गुंतवणूक म्हणून. शहरी भागातील महिलाही गुंतवणूक आणि फॅशन म्हणून सोन्याकडे पाहतात. भारतातील एकूण सोन्याची वार्षिक मागणी ११०० ते १२०० टन एवढी आहे. त्यापैकी ५५ ते ६० टक्के खप हा ग्रामीण भागात होतो.

गेल्या काही दिवसांतील सोने, चांदीचे दर असे (विनाजीएसटी)

तारीख सोने (प्रतितोळे) चांदी (प्रतिकिलो)
२८ जानेवारी ५७ हजार ४०० ६९ हजार
१ फेब्रुवारी ५७ हजार ४०० ६९ हजार
२६ फेब्रुवारी ५५ हजार ९०० ६५ हजार ५००
१० मार्च ५५ हजार ६०० ६३ हजार
११ मार्च ५६ हजार ६०० ६४ हजार
१६ मार्च ५८ हजार ६७ हजार
१७ मार्च ५९ हजार ६८ हजार
१८ मार्च ५९ हजार ३०० ६९ हजार