Gulabrao Patil : एसटी विभागाला 10 दिवसांत 10 कोटींचे उत्पन्न : गुलाबराव पाटील | Gulabrao Patil statement about 10 crore income of ST department income in 10 days jalgaon news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Gulabrao Patil

Gulabrao Patil : एसटी विभागाला 10 दिवसांत 10 कोटींचे उत्पन्न : गुलाबराव पाटील

Jalgaon News : राज्य शासनाने महिलांना बस प्रवासात ५० टक्के सवलत दिली. हा निर्णय यशस्वी झाला आहे. उन्हाळी सुट्टी व लग्नसराईमध्ये जळगाव विभाग १० दिवसांत तब्बल १० कोटी उत्पन्न मिळवून राज्यात प्रथम आला. (Gulabrao Patil statement about 10 crore income of ST department income in 10 days jalgaon news)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी १ मेस केलेल्या घोषणेच्या अनुषंगाने हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियान यशस्वीपणे राबून जळगाव विभागाने राज्यात अव्वलस्थानी येण्यासाठी सांघिक प्रयत्न करावेत, असे आवाहन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी शुक्रवारी (ता. १२) येथे केले.

सागर पार्कवर १० नवीन साध्या बसच्या लोकार्पणप्रसंगी ते बोलत होते. आमदार चिमणराव पाटील, विभाग नियंत्रक बी. सी. जगनोर, विभागीय वाहतूक अधिकारी दिलीप बंजारा, कामगार अधिकारी कमलेश भावसार, उपअभियंता अजय पाटील, अर्चना भदाणे, डेपो मॅनेजर संदीप पाटील, विजय पाटील, आर. के. पाटील, राहुल पाटील, एस टी महामंडळाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

पालकमंत्री म्हणाले, की जिल्ह्यातील महामंडळाची बससेवा अधिक सक्षम करण्यावर भर आहे. साध्या व इलेक्ट्रिक बसेस महामंडळाच्या ताफ्यात टप्प्याटप्प्याने दाखल होणार आहेत.

जळगाव एसटीकडे ८३९ वाहने होती. सध्या ७२३ वाहने आहेत. त्यापैकी साधारणतः ५७ बसही मोडकळीस निघाल्या आहेत. विभागात बऱ्याचशा बस जुन्या झाल्या असून, त्या वारंवार नादुरुस्त होत असल्याने रस्त्यात ब्रेक डाऊन होत असतात. त्यामुळे बऱ्याचशा उशिरा धावतात व काही वेळेस फेऱ्या रद्द कराव्या लागतात.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

महिलांना भाड्यातील सवलतीमुळे प्रवासी संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होत असून, पालकमंत्री पाटील यांच्या निर्देशानुसार विभाग नियंत्रक बी. सी. जगनोर यांनी साध्या नवीन १०० बसचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला आहे. पालकमंत्री पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे प्रत्यक्ष भेटून नवीन १०० साध्या बस व १४१ इलेक्ट्रिक बस मिळाव्यात, अशी मागणी केली होती. त्यानुसार १० नवीन साध्या बस प्राप्त झाल्या.

वातावरणातील प्रदूषण कमी करण्याच्या उद्देशाने राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या पर्यावरणपूरक बस पाचोरा येथे २१, मुक्ताईनगरला १७, चोपड्यात २१, इतर भागांसाठी ६२, अशा एकूण १४१ इलेक्ट्रिक बसला पालकमंत्री पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे शासनाने मान्यता दिली. जळगाव, पाचोरा, चोपडा, मुक्ताईनगर येथे चार्जिंग स्टेशन उभारण्यात येणार असल्याचे श्री. जगनोर यांनी सांगितले. श्री. भावसार यांनी सूत्रसंचालन केले. डेपो मॅनेजर पाटील यांनी आभार मानले.

जळगाव विभाग महाराष्ट्रात प्रथम

दिवाळी २०२२ या कालावधीत उत्पन्न व प्रवास किलोमीटरमध्ये वाढ करून विभागाला महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर ठेवण्यात यश मिळाले होते. सध्या लग्नसराई, महिलांना प्रवास भाड्यात दिलेल्या सवलतीमुळे प्रवासी संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. त्यामुळे उन्हाळी गर्दीत जळगाव विभाग उत्पन्नवाढीत राज्यात प्रथम क्रमांकावर आल्याने विभाग नियंत्रक जगनोर यांचा पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.