शेकडो बळींनंतर झाली आरोग्य यंत्रणा सक्षम !

convid
convid

जळगाव ः कोरोनाच्या आव्हानापुढे जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सुरवातीस तोकडी पडली होती. मात्र मृत्यूची संख्या वाढल्यानंतर जिल्ह्यात आरोग्याच्या सुविधा अत्याधुनिक करण्याची प्रक्रिया सुरू झाली. तब्बल एक हजार ३२५ कोरोनाबाधितांच्या मृत्यूच्या बदल्यात जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सक्षम झाली. शासनासह लोकसहभागातून १०० कोटींच्या आरोग्यविषयक सुविधांची कामे जिल्ह्यात झाली. यंत्रणा सक्षम असती, तर अनेक जीव वाचविता आले असते. 

जळगाव जिल्ह्यात २८ मार्च २०२० ला पहिला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला. नंतर वाढलेली रुग्णांची संख्या दहा हजारांवर केव्हा गेली अन् त्यात अनेकांचे बळी जाण्यास वेळ लागला नाही. आता कोरोनाबाधितांची संख्या ५३ हजार ९९८ एवढी आहे. काही महिन्यापूर्वी जिल्ह्यातील आरेाग्य यंत्रणा ढिसाळ होती. 

अधिकाऱ्यांचे टीमवर्क 
नवीन जिल्हाधिकारी अभिजित राऊत, शासकीय रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयाचे (जिल्हा कोविड रुग्णालय) नवीन अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, तत्कालीन इस्टंट कमांडट गोरक्ष गाडीलकर यांनी आरेाग्य यंत्रणा बदलवून बाधित रुग्णांचे अधिकाधिक जीव कसे वाचविता येईल? यावर आपला फोकस ठेवला. कोविडच्या प्रत्येक रुग्णाला कोणते उपचार सुरू आहेत, त्या कक्षातील डॉक्टर, नर्सेस त्यावर उपचार करताहेत किंवा नाही यावर २४ तास निगराणीसाठी कोविड रुग्णालयात सीसीटीव्ही उभारले. यामुळे सर्वच यंत्रणा सक्षमतेने कार्यरत होऊन मृत्युदर कमी होण्यास मदत झाली. 

तालुका स्तरावर योजना 
जिल्हा कोविड रुग्णालय केवळ कोविड रुग्णांसाठी जाहीर केल्यानंतर, जिल्हा रुग्णालय डॉ. उल्हास पाटील रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आले. तेथे गरजूंच्या इतर आजारांवर उपचार करण्यात आले. जिल्हा कोविड रुग्णालयावरील रुग्णांचा भार कमी व्हावा म्हणून डॉ. पाटील रुग्णालयासोबतच तालुकास्तरावर कोविड सेंटर उभारले गेले. खासगी डॉक्टरांना कोविड हॉस्पिटल सुरू करण्यास परवानगी दिली गेली. यामुळे रुग्णांना जेथे वाटेल तेथे कोविडचे उपचार घेता आले. 

लोकसहभागाची राज्यभर चर्चा 
जिल्हा रुग्णालयासह जिल्ह्यातील तालुकास्तरावर लोकसहभागातून कोविड केअर सेंटर उभारून तेथे लोकसहभागातूनच बेड, ॲाक्सिजन बेड, व्हेंटिलेटर बेडची सुविधा दिली गेली. शासनाचा निधी व लोकसहभागातून जिल्ह्यात आरेाग्य यंत्रणा सक्षम करण्यासाठी शंभर कोटींची कामे झाली आहे. बेड साईड अस्टिटंट ही कल्पनाही राज्यात प्रथम जळगाव जिल्ह्यातच सुरू झाली. 

आता जिल्ह्यात अत्याधुनिक प्रकारच्या ऑक्सिजन पाइपलाइन, ऑक्सिजन बेड, नॉन आयसीयू बेड, आयसीयू बेड, व्हेंटिलेटर बेड, कोरोना चाचण्यांची स्वतंत्र लॅब, ऑक्सिजन टँक आदी सक्षम आरोग्य यंत्रणा येथे तयार झाली आहे. ही यंत्रणा टिकवून ठेवणे व आलेल्या प्रत्येकाचा जीव वाचविणे हे आरोग्यसेवेतील अधिकाऱ्यांसह सर्वांचीच जबाबदारी असेल. 

अधिष्ठात्याचे निलंबन, जिल्हाधिकाऱ्यांची बदली 
भुसावळ येथील नेहते नावाच्या कोरोनाबाधित वृद्धेचा मृतदेह जिल्हा रुग्णालयातील शौचालयात सात दिवसांनंतर आढळून आल्याने आरोग्य कर्मचारी किती कार्यक्षमपणे काम करतात, याचा पुरावा मिळाला. हे प्रकरण राज्यातच नव्हे, तर देशभरात गाजले. ढिसाळ आरोग्य यंत्रणेला जबाबदार धरत तत्कालीन वैद्यकीय महाविद्यालयाचे तत्कालीन अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरेंसह इतर सहा डॉक्टरांचे निलंबन झाले होते. तर जिल्हाधिकारी अविनाश ढाकणे यांची बदली झाली होती. 


जिल्हा रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयात आमचा टीमवर्कवर भर आहे. टीमवर्कमुळे मी आल्यापासून सर्वच यंत्रणा सक्षम करीत गेलो. अत्याधुनिक प्रकारची यंत्रणा भविष्यात अनेक वर्षे टिकेल. कोरोनामुळे शासकीय आरोग्य यंत्रणेचे व मनुष्यबळाचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. 
- डॉ. जयप्रकाश रामानंद 
अधिष्ठाता, जळगाव 
 

संपादन- भूषण  श्रीखंडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com