
Holi 2023 : रंग बरसे! ‘दिव्यागां’नी उधळले माणुसकीचे रंग
जळगाव : येथील रुशील मल्टिपर्पज फाउंडेशन संचालित उडान दिव्यांग प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून पर्यावरणपूरक होळी पेटविण्यात आली. काव्यरत्नावली चौकात पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांच्या हस्ते होळी (Holi) पेटविण्यात आली. (holi 2023 Children with disabilities celebrated holi with Superintendent of Police and police jalgaon news)
त्यानंतर दिव्यांग बालकांनी पोलिस अधीक्षक व पोलिसांना रंग लावत आनंद साजरा केला. काव्यरत्नावली चौकात ‘उडान’तर्फे झाडांचा पालापाचोळा टाकून होळी पेटविण्यात आली. त्यात विविध प्रकारच्या आहुती, कापूर, अत्तर, धूप, लोभान व इतर साहित्य टाकून हवन करण्यात आले. पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांचे ‘उडान’च्या अध्यक्षा हर्षाली चौधरी व गतिमंद बालकांनी स्वागत केले.
दिव्यांग आणि गतिमंद बालकांना समाजाच्या प्रवाहात आणण्यासाठी ‘उडान’ राबवीत असलेले उपक्रम कौतकास्पद आहेत. होळीसारख्या सणानिमित्त या वेळी पर्यावरणपूरक होळी, तसेच नैसर्गिक रंगाची उधळण करीत पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.
हेही वाचा : तुमच्याकडं कागदी स्वरुपातले शेअर आहेत? मग हे वाचाच....
आजच्या उपक्रमांतून इतरही बोध घेतील. दिव्यांग आणि गतिमंद बालकांच्या उपक्रमासाठी आमचे सदैव सहकार्य असेल, असे आश्वासन जिल्हा पोलिस अधीक्षक राजकुमार यांनी दिले.
गतिमंद बालकांनी पोलिस अधीक्षक राजकुमार, इतर पोलिस कर्मचारी व होमगार्ड यांना नैसर्गिक रंग लावत आनंद साजरा केला. पोलिस अधीक्षकांनी बालकांना रंग लावत सेल्फी काढली. उपक्रमासाठी ‘उडान’चे महेंद्र पाटील, जयश्री पटेल, प्रतिभा पाटील, खुशबू महाजन, सोनाली भोई, प्रा. आर. बी. गुजराथी, हेतल पाटील, चेतन वाणी, जकी अहमद यांनी सहकार्य केले.