
Gas Cylinder : वढोद्यात अवैध गॅस सिलिंडरचा साठा; पोलिस कारवाईत 29 सिलिंडर जप्त
चोपडा : वढोदा (ता. चोपडा) येथील नरेंद्र छगन पाटील हे अवैधरीत्या २९ गॅस सिलिंडरचा बेकायदेशीररीत्या साठा करून विना परवानगी गॅसची विक्री करीत असल्याची गोपनीय माहिती ग्रामीण पोलिसांना मिळाली होती. त्या माहितीनुसार शुक्रवारी (ता. २४) पोलिसांनी सापळा रचून कारवाई केली.
पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार तालुक्यातील वढोदा येथे नरेंद्र छगन पाटील (रा. वढोदा) याने स्वतःच्या फायद्यासाठी दैनंदिन जीवनासाठी आवश्यक असलेले २९ गॅस सिलिंडर (भरलेले) अवैधरीत्या साठवणूक केली आहे.
साठवणूक केलेल्या गॅस सिलिंडर टाक्यांमधून (टाटा एसीई क्रमांक एमएच १८, एए ५१८१) विक्री करताना आढळून आले. या सर्व टाक्या व वाहनासह २ लाख २८ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
मानवी वस्ती असलेल्या ठिकाणी उघड्यावर बेकायदेशीर साठवणूक करून लोकांना धोका निर्माण होईल, मानवी जीवन धोक्यात येईल, अशा पद्धतीने निष्काळजीपणे ठेवलेल्या असताना गॅस सिलिंडर टाक्या मिळून आल्यात म्हणून पुरवठा तपासणी अधिकारी देवेंद्र नेतकर यांच्या फिर्यादीवरून ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलिस निरीक्षक कावेरी कमलाकर, उपनिरीक्षक अमरसिंग वसावे, पोलिस कर्मचारी राजू महाजन, सुनील कोळी, युसूफ शेख आदींनी कारवाई केली आहे.