Jalgaon News : महापालिकेचा काखेत कळसा अन्‌ गावाला वळसा! वाहनांचे अवैध पार्किंग, कारवाई कधी? | illegal parking of four wheeler vehicles near entrance of Municipal Corporation jalgaon news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jalgaon Municipal Corporation

Jalgaon News : महापालिकेचा काखेत कळसा अन्‌ गावाला वळसा! वाहनांचे अवैध पार्किंग, कारवाई कधी?

Jalgaon News : महापालिकेतर्फे शहरातील महाबळ, गणेश कॉलनी, तसेच महामार्गावरील अतिक्रमण काढले जात आहेत. मात्र महापालिकेच्या प्रवेशद्वाराजवळच केल्या जात असलेल्या चार चाकी वाहनांच्या अवैध पार्किंगकडे मात्र लक्ष दिले जात नाही. (illegal parking of four wheeler vehicles near entrance of Municipal Corporation jalgaon news)

शहरातील रस्ते वाहतूकीसाठी मोकळे असावेत या उद्येशाने महापालिकेतर्फे रस्त्यावरील अतिक्रमण काढले जात आहे. मात्र, अतिक्रमण काढून मोकळ्या झालेल्या जागेचा उपयोग चार चाकीचे वाहन चालक पार्किंग म्हणून करीत असल्याचे दिसत आहे. महापालिकेच्या सतरा मजली इमारतीजवळच हा प्रकार दिसून येत आहे.

वाहतूकीसाठी अतिक्रमण काढले

महापालिकेच्या प्रवेशद्वाराजवळ विक्रेत्यांचे मोठ्या प्रमाणात अतिक्रमण होत होते. त्यामुळे संपूर्ण रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत होण्याबरोबरच अपघातही झाले होते. त्यामुळे तत्कालीन महापालिका आयुक्त संजय कापडणीस यांनी या अतिक्रमणधारकांना हटवून महापालिकेच्या बाजूला असलेल्या गल्लीत ‘खाऊ गल्ली’तयार करून त्या ठिकाणी त्यांना जागा दिल्या. त्यामुळे या रस्त्यावरील अतिक्रमण हटले आणि वाहतूक सुरळीत होवू लागली.

‘त्या’ठिकाणी वाहनांचे अतिक्रमण

महापालिकेच्या प्रवेशद्वाराजवळ अतिक्रमण हटवून जागा मोकळी झाली. मात्र, आता या मोकळ्या जागेचा वापर चाकी वाहनधारकांनी चक्क पार्किंग म्हणून सूरू केला आहे. भररस्त्यावर आता वाहने पार्किंग होत आहेत. सकाळी आठपासून तर थेट रात्री दहापर्यंत या ठिकाणी चार चाकी वाहने लावलेली दिसत आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

मनपा, वाहतूक पोलीसांचे दुर्लक्ष

रस्त्यावर वाहने लावल्यास वाहतूक पोलीस तातडीने कारवाई करतात. तसेच, रस्त्यावर अतिक्रमण केल्यास महापालिका कारवाई करते. परंतु, भररस्त्यावर होणाऱ्य या अतिक्रमणाकडे महापालिका आणि शहर वाहतूक पोलीसांचेही दुर्लक्ष होत आहे.

विशेष म्हणजे चार चाकी वाहने पार्किंग होत असल्यामुळे रस्त्यावरील वाहतूकीस अडथळा होत असतो. या ठिकाणी किरकोळ अपघातही होत आहेत. रात्री तर या रस्त्यावर वाहन जाण्यासही जागा राहात नाही. अगदी महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोरही वाहने लावलेली असतात.

कारवाई होणार का?

महापालिका, तसेच शहर वाहतूक विभागाने या ठिकाणी होणारे चार चाकी वाहन पार्किंग तातडीने बंद करण्याची गरज आहे. या ठिकाणी वाहने लावणाऱ्यांवर कारवाई करण्याची गरज आहे. अन्यथा याठिकाणी मोठा अपघात झाल्यास महापालिका व शहर वाहतूक विभाग जबाबदार असेल. त्यामुळे दोन्ही विभागाच्या अधिकाऱ्यांनी याबाबतीत लक्ष देण्याची गरज आहे.