Jalgaon News: अवैध वाळू वाहतूक उठली नागरिकांच्या जिवावर; डंपरच्या धडकेत 3 गंभीर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jalgaon News

Jalgaon News: अवैध वाळू वाहतूक उठली नागरिकांच्या जिवावर; डंपरच्या धडकेत 3 गंभीर

जळगाव : अवैध वाळू वाहतूक नागरिकांच्या जिवावर उठली आहे. शुक्रवारी (ता. २४) सकाळी सव्वासहाच्या सुमारास टॉवर चौकात मद्यधुंद डंपरचालकाने चारचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात कारमधील तीन जण गंभीर जखमी झाले.

कारमधील जखमींना नागरिकांनी काढून तत्काळ रुग्णालयात दाखल केले, तर कारला धडक देऊन चालक डंपर काही अंतरावर थांबवून पसार झाला.

जळगाव शहरातील टॉवर चौकात शुक्रवारी सकाळी सव्वासहाच्या सुमारास कार (एमएच १९, बीजे ७९१७) नेहरू पुतळाकडून टॉवर चौकात येत होती. त्याच वेळी आव्हानेमार्गे, शिवाजीनगरकडून चित्रा चौकाकडे जाणाऱ्या भरधाव डंपरने (एमएच १९, झेड ४१००) टॉवर चौकात कारला डाव्या बाजूने जोरदार धडक दिली.

या धडकेत कारमध्ये बसलेल्या शिक्षिका सविता अशोक सानेवणे (वय ४०, रा. रामानंदनगर, जळगाव) आणि शिक्षक विठ्ठल रूपसिंह चव्हाण (४२) आणि सोबत असलेले रजियाबाद तडवी गंभीर जखमी झाले. कारचाही चुराडा झाला. सुदैवाने मोठी दुर्घटना टळली.

सकाळच्या शांततेत डंपरने कारला जोरदार धडक दिल्याने मोठा आवाज झाला. जवळच असलेल्या शहर ठाण्याचे पोलिस कर्मचारी, तसेच मॉर्निंग वॉकला निघालेले व कामानिमित्त जाणाऱ्या नागरिकांनी कारमधील जखमींना काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करून रुग्णालयात दाखल केले.

दुचाकीचालकही थोडक्यात बचावले

या डंपरने आधी गेंदालाल मिल, शिवाजीनगर येथे काही दुचाकी, भाजीपाला विक्रीसाठी जाणाऱ्यांना कट मारल्याने दुचाकीस्वारही थोडक्यात बाचाविले. त्यानंतर उड्डाणपुलावरून भरधाव येत थेट टॉवर चौकात रस्ता ओलांडत असलेल्या कारला धडक दिली.

चालक फरारी

डंपरचालक घटनास्थळापासून काही अंतरावर डंपर सोडून पसार झाला. पोलिसांनी कार व डंपर शहर पोलिस ठाण्यात जमा केले आहे.

टॅग्स :Jalgaonaccident