Winter Health News : नाक- कान-घशाच्या विकारात वाढ; थंडी, प्रदूषणाचा परिणाम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Cold Cough Patient Increase

Winter Health News : नाक- कान-घशाच्या विकारात वाढ; थंडी, प्रदूषणाचा परिणाम

जळगाव : गोदावरी फाउंडेशन संचालित डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय तथा रुग्णालयाने शस्त्रक्रिया अभियान सुरू केले आहे. त्यात सुरू असलेल्या तपासणीत सध्या थंडीची लाट व प्रदूषणामुळे कान-नाक- घशाच्या विकाराचे रुग्ण वाढल्याचे समोर आले आहे.

१ जानेवारीपासून सुरू झालेल्या शस्त्रक्रिया अभियानात गोदावरीतील तज्ज्ञ डॉक्टर व पथक गावागावांत जाऊन नागरिकांची तपासणी करीत आहेत. यात थंडीच्या वातावरणाचा परिणाम झाल्याने नाक- कान- घसा रुग्णांची संख्या वाढलेली दिसून येत आहे. (Increase in ear nose and throat disorders Cold effect of pollution It is clear from mission of Godavari Jalgaon News)

गेल्या एक महिन्यात ७५ च्या वर गावांत शस्त्रक्रिया अभियानांतर्गत डॉक्टरांची टीम पोचली. यात नाक- कान- घसा विभागातील डॉ. हर्शल महाजन, डॉ. श्रुती खंडागळे, डॉ. चारूशीला सोनवणे, डॉ. रितू रावल यांनी नागरिकांची तपासणी केली.

सध्या थंडीच्या वातावरणाचा परिणाम म्हणून कानातून पू येणे, कानाचे हाड सडणे, डोळ्यांतून घाण पाणी, चिकट द्रव येणे, याचबरोबर नाकाचे वाढलेले हाड, नाकातून सतत पाणी वाहणे अशा समस्या असलेल्या २५०हून अधिक रुग्णांची तपासणी या शिबिरातून करण्यात आली. शिबिरात या रुग्णांना वेळीच पुढील उपचाराबाबत मार्गदर्शन व सल्‍ला देण्यात आला.

हेही वाचा : ....इथं बनतो आपला लाडका तिरंगा

ज्या रुग्णांनी तयारी दर्शविली त्यांना गावाहून रुग्णालयाच्या गाडीतच जळगाव येथे आणून डॉ. अनुश्री अग्रवाल, डॉ. विक्रांत वझे, डॉ. पंकजा बेंडाळे, डॉ. भट या एम.एस. तज्ज्ञांनी दुर्बिणीद्वारे तपासणी करून १२५ च्या वर रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्यात.

थंडीत नाक- कान- घसा रुग्णांना अधिक त्रास होतो. यात कान ठणकतो, कानातून पू बाहेर येणे, तसेच योग्य वेळी तपासणी न केल्याने कानात मळ चिकटून राहतो व पुढे याचे गंभीर परिणाम होऊन शस्त्रक्रियेची गरज भासू शकते. रुग्णांनी त्याबाबत काळजी घ्यावी व तज्ज्ञांशी संपर्क करावा, असे आवाहन डॉ. चारुशीला सोनवणे, डॉ. रितू रावल यांनी केले आहे.