Jalgaon News : जनावरे, वीजपंप चोरीच्या घटनांत वाढ; ग्रामस्थांना खबरदारीचे आवाहन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crime News

Jalgaon News : जनावरे, वीजपंप चोरीच्या घटनांत वाढ; ग्रामस्थांना खबरदारीचे आवाहन

मेहुणबारे (जि. जळगाव) : गिरणा परिसरात जनावरांसह शेतातील वीजपंप, स्टार्टर व औजारे चोरी (Theft) होण्याच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. त्या पाश्‍वभूमीवर मेहुणबारे पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक विष्णू आव्हाड यांनी

आपल्या हद्दीतील प्रत्येक गावातील ग्रामस्थांना खबरदारीचे आवाहन केले आहे. (Increase in thefts of animals power pumps police appealed to villagers to be cautious jalgaon news)

मेहुणबारे (ता. चाळीसगाव) हद्दीतील ग्रामस्थांना मेहुणबारे पोलिसांनी आपली गुरे, शेती उपयोगी अवजारे, तसेच वीजपंपांची होत असलेली चोरी लक्षात घेता सहाय्यक पोलिस निरीक्षक विष्णू आव्हाड व उपनिरीक्षक प्रकाश चव्हाणके राजू सांगळे, पोलिस कर्मचाऱ्यांनी यासंदर्भात जनजागृतीचे काम हाती घेतले आहे.

जनावरांची कशी घ्यावी काळजी

ग्रामस्थांनी आपली गुरे ढोरे, शेतात किंवा रस्त्याच्या बाजूला अथवा निर्जनस्थळी किंवा दूरवर बांधू नये. आपली जनावरे ज्या ठिकाणी बांधली जातात त्या ठिकाणाला (खळ्यात) चारही बाजूने कुंपण करून बंदिस्त करावे. शक्य असल्यास आपली गुरे गावाजवळ किंवा आपण राहत असलेल्या ठिकाणी जवळपास बांधावी.

रात्रीच्या वेळी त्या ठिकाणी लाइटची व्यवस्था करावी. गुरे जवळपास बांधणे शक्य नसल्यास ज्या ठिकाणी गुरे बांधलेली जातात.त्या ठिकाणी रात्रीच्यावेळी आपण स्वतः थांबावे. गावातील ३ ते ४ शेतकरी मिळून आपली गुरे एकत्रित बांधावी.

संशयितांवर राहणार नजर

मेहुणबारे पोलिसांनी प्रत्येक गावात किंवा शेताचे सभोवताली संशयित फिरणाऱ्या व्यक्तींवर त्या गावातील ग्रामस्थांना लक्ष ठेवायला सांगितले आहे. परिसरात रात्री अपरात्री कुणीही संशयिताचे वाहन दिसल्यास तातडीने पोलिसांना कळवावे.

हेही वाचा : हिंडेनबर्ग अहवालाचा फटका भाजपला भविष्यात बसणार?

शेतातील विहिरीवरील पाण्याची मोटार, स्टार्टर, पत्री पेटी बसवली असल्यास त्यास कुलूप लावून सुरक्षित ठेवावी. गावात कुठल्याही प्रकारच्या व्यक्तीवर संशय आल्यावर गावातील पोलिस पाटील किंवा पोलिसांना माहिती द्यावी.

लोकसहभागातून सीसीटीव्ही बसवावे

मेहुणबारे पोलिस ठाण्यांतर्गत प्रत्येक गावातील सार्वजनिक ठिकाणी लोकसहभागातून किंवा ग्रामंपचायतीमार्फत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन मेहुणबारे पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक विष्णू आव्हाड यांनी केले आहे.

गावात कुठेही काही चुकीची घटना होत असेल तर लगेचच पोलिसांना संपर्क करावा. जेणेकरून चुकीच्या कामांना आळा बसेल, असे श्री. आव्हाड यांनी सांगितले.

"रात्रीच्यावेळी गस्तीवर असणारे पोलिसांना सहकार्यासाठी प्रत्येक गावातील नागरिकांनी ग्रामस्तरावर स्थानिक पोलिस मित्रांचे ग्राम सुरक्षा दल स्वयंस्फूर्तीने स्थापन करून पोलिसांना सहकार्य करावे. जेणेकरून आपल्या भागातील होणाऱ्या चोरीच्या घटनांना आळा बसेल."
- विष्णू आव्हाड सहाय्यक पोलिस निरीक्षक, मेहुणबारे (ता.चाळीसगाव)