Jalgaon News : मेडिकल व्हॅनद्वारे ग्रामीण भागात तपासणी; जिल्हाधिकारी अमन मित्तल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Collector Aman Mittal, Superintendent of Police M.

Jalgaon News : मेडिकल व्हॅनद्वारे ग्रामीण भागात तपासणी; जिल्हाधिकारी अमन मित्तल

जळगाव : रेडक्रॉसच्या माध्यमातून ‘रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा’ या तत्वानुसार मेडिकल व्हॅनद्वारे संपूर्ण जिल्ह्यातील ग्रामीण व आदिवासी बांधवांना रुग्णसेवा देण्यात येणार आहे.

यात जनरल रुग्ण तपासणी, दंतरोग, नेत्ररोग, स्त्री व बालरोग तपासणी, आवश्यकतेनुसार इतर तपासणी करण्यात येणार आहेत. जास्तीत जास्त नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी केले. (Inspection in rural areas by medical van Collector Aman Mittal Jalgaon News)

इंडियन रेडक्रॉस सोसायटीत कोरोना काळातील जळगावचे उल्लेखनीय कार्य लक्षात घेता कॅनडियन रेडक्रॉसच्या माध्यमातून आणि राष्ट्रीय शाखा नवी दिल्ली व राज्य शाखा मुंबई यांच्या सहकार्याने अद्ययावत तंत्रज्ञानाने परिपूर्ण मेडिकल व्हॅनचे उद्‌घाटन रेडक्रॉसचे पदसिद्ध अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी मित्तल यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते.

पोलिस अधीक्षक एम. राजकुमार, जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर, रेडक्रॉसचे कोशाध्यक्ष शेखर सोनाळकर, आपत्ती व्यवस्थापन चेअरमन सुभाष सांखला, कार्यकारिणी सदस्य भालचंद्र पाटील, पुष्पा भंडारी, शांता वाणी, विश्वनाथ जोशी उपस्थित होते.

रेडक्रॉस राष्ट्रीय शाखा, राज्य शाखेतर्फे जळगाव रेडक्रॉसला मिळालेले तीन हजार पल्स ऑक्सिमीटर, प्रथमोपचार प्रशिक्षणासाठी लागणारी मॅनिकिन, २० ऑटोमेटेड ऑक्सिजन कॉन्संट्रेटर, रॅपटोकोस कंपनीतर्फे मिळालेले थ्रेप्टिन प्रोटीन बिस्कीट आदी साहित्याची माहिती, मेडिकल व्हॅनच्या भविष्यातील उपक्रमाबाबत माहिती रेडक्रॉसचे चेअरमन विनोद बियाणी यांनी प्रास्ताविकात दिली.

हेही वाचा : बँक खात्याला जोडलेल्या सिमकार्डबाबत बाळगा ही काळजी...

रेडक्रॉसचे उपाध्यक्ष गनी मेमन यांनी रेडक्रॉसच्या सध्या परिस्थितीतील सुरू असलेल्या उपक्रमांची माहिती दिली. डॉ. आशिया यांनी रेडक्रॉस अतिशय सेवा भावनेतून कार्य करीत असल्याचे सांगितले. पोलिस अधीक्षक राजकुमार म्हणाले, की शहरात सामाजिक कार्यासाठी असणारी स्पर्धा ही मनाला भावणारी आहे, या भावनेतूनच अनेक गरजू नागरिकांची मदत होत आहे.

जनरल प्रॅक्टिशनर असोशिएशनचे अध्यक्ष डॉ. धनराज चौधरी, निमाचे अध्यक्ष डॉ. सतीश चौधरी, डॉ. नरेंद्र ठाकूर, डॉ. लीना बोरोले, डॉ. राजेश सुरळकर यांना प्रातिनिधिक स्वरूपात पल्स ऑक्सिमीटर देण्यात आले. थॅलेसीमिया अमृत योजनेत योगदान देणाऱ्या देणगीदात्यांचा सन्मानही करण्यात आला.

निक्षय मित्र योजनेंतर्गत टीबीग्रस्त रुग्णांना पोषक आहार किट्सचे वाटप करण्यात आले. शाहू महाराज हॉस्पिटलमधील रुग्णांसाठी प्रातिनिधिक स्वरूपात मॅन्युअल व्हेंटीलेटर देण्यात आले. जनसंपर्क अधिकारी उज्वला वर्मा यांनी सूत्रसंचालन केले. रक्त केंद्र चेअरमन डॉ. प्रसन्नकुमार रेदासनी यांनी आभार मानले.

टॅग्स :JalgaonMedical