
Jalgaon News : ‘भुयारी गटार टप्पा १.०’ सुरू करण्यात हेतूपुरस्सर अडथळा; प्रकल्प अभियंत्यांचा हलगर्जीपणा
जळगाव : महापालिकेची ‘भुयारी गटार १.०’ (subway sewer phase 1.0) योजना पूर्ण झाली आहे.
फक्त प्रकल्पावर वीजपुरवठा जोडणी बाकी आहे, त्यासाठी तब्बल आठ वेळा निविदा काढण्यात आल्या. (Intentional obstruction to start of subway sewer phase 1 0 deliberate delay by engineer jalgaon news)
आता निविदा मंजूर होऊनही आदेश देण्यात हेतूपुस्सर विलंब केला जात आहे. विशेष म्हणजे मक्तेदारातर्फे डिझेल मशिनवर काम करण्याची तयारी असतानाही प्रकल्प विभागाकडून शौचालयाच्या टाक्यांच्या कनेक्शनची अद्यापही जोडणी केली जात आहे.
प्रकल्प विभागाच्या अभियंत्याकडून हेतूपुस्सर विलंब करण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे. शहरात ‘भुयारी गटार १.०’ राबविण्यासाठी चार वर्षांपासून काम सुरू आहे. मात्र, अद्यापही योजना पूर्ण झालेली नाही. ज्या ठिकाणाहून सांडपाण्यावर प्रक्रिया होणार आहे.
त्या ठिकाणी अद्यापही वीजपुरवठा आलेला नाही. मात्र, मक्तेदाराने डिझेल मशीन लावून लेंडी नाल्याच्या पाण्यावर त्याची चाचणी करून प्रक्रिया पूर्ण केल्याचे दाखवून दिले आहे.
मनपा अभियंत्याकडून दिरंगाई
महापालिकेने या प्रकल्पासाठी अभियंत्याची नियुक्ती केली आहे. प्रकल्पासाठी वीजजोडणीची गरज आहे. त्यासाठी मंजुरी मिळाली आहे. मात्र, जोडणीसाठी मक्तेदार मिळत नसल्याचा बहाणा करीत प्रकल्प अभियंत्याने तब्बल आठवेळा निविदा काढल्या आहेत. मक्तेदाराने तयारीही दाखविली आहे. मात्र, पुन्हा त्यासाठी मंजुरी आवश्यक असल्याचा बहाणा करून वीजजोडणीसाठी वर्कऑर्डर दिली नाही. त्यामुळे पुन्हा विलंब होणार आहे.
हेही वाचा : देशातले ३२ म्युच्युअल फंडांचं व्यवस्थापन आहे महिलांच्या हाती...
शौचालय टाक्यांची जोडणीच नाही
भुयारी गटारी योजनेच्या प्रकल्पाची चाचणी मक्तेदाराने डिझेल मशिनवर करून दाखविली आहे. खासदार उन्मेष पाटील यांनी घेतलेल्या बैठकीत सद्यस्थितीत हा प्रकल्प डिझेल मशिनवरही चालू शकतो, असे त्यांनी सांगितले आहे.
मात्र, महापालिकेचा प्रकल्प अभियंता वीजजोडणीवरच अडून बसल्याची माहिती मिळाली. त्यामुळे हा प्रकल्प सुरू होण्यास विलंब होत आहे. वीजजोडणी नसल्यामुळे आम्ही शैचालयाच्या टाक्यांची जोडणी करू शकत नाही, असे सांगून प्रकल्पाधिकारी वेळकाढू धोरण राबवित असल्याचे दिसत आहे.
रस्त्याच्या कामात चेंबर्स बुजविले
‘भुयारी गटर योजना १.०’चा प्रकल्प सुरू झालेला नाही. यासाठी रस्त्यात, तसेच गल्लीत काढलेले चेंबर्स आता रस्त्याचे काम सुरू असल्याने ते बुजविण्यात येत आहेत. आता नागरिकांच्या शौचालयाच्या पाइपलाइनची जोडणी करण्यासाठी हे चेंबर्स पुन्हा उघडावे लागतील आणि पुन्हा रस्त्याची तोडफोड करावी लागणार काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
त्यामुळे शौचालयाचे पाईप जोडणीबाबत प्रकल्प विभागाचे नेमके धोरण काय? हे आता उघड होण्याची गरज आहे. शौचालयाचे पाईप जोडणीसाठी महापालिकेने काही मक्तेदाराही नियुक्त केले आहेत.
मात्र, अद्यापही जोडणी का केली जात नाही? वीजजोडणी होईपर्यंत डिझेल पंपावर हा प्रकल्प सुरू का केला जात नाही, असे प्रश्न आता उपस्थित होत आहेत.
महापालिकेच्या प्रकल्पाधिकाऱ्यांकडून याची उत्तरे घ्यावीत, महापालिका पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी लक्ष घालून प्रकल्पाधिकाऱ्यांकडून कामे करून घेण्याची गरज आहे, अन्यथा खत प्रकल्पाप्रमाणे हा प्रकल्पही केवळ कागदारवरच सुरू असलेला दिसून येईल.