Cotton Crop Damage : कापसाला नाही भाव, कीटकांचा प्रादुर्भाव; साठवलेल्या कापसामुळे खाजेचे विकार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Itching disorders due to stored cotton to farmers jalgaon news

Cotton Crop Damage : कापसाला नाही भाव, कीटकांचा प्रादुर्भाव; साठवलेल्या कापसामुळे खाजेचे विकार

तोंडापूर (जि. जळगाव) : कापसाला भाव मिळत नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी कापूस घरात साठवून ठेवला आहे. मात्र, या कापसामुळे (Cotton) बळीराजाला अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. (Itching disorders due to stored cotton to farmers jalgaon news)

काही घरांत साठवलेल्या कापसावर कीड पडली आहे, या किडीला ‘कॉटन डस्ट माईट’ असे संबोधले जाते. या प्रकारातील किडीचे वैज्ञानिक नाव पायोमोट्स ट्रीटीसी असून, अष्टपाद कीटकांचा हा प्रादुर्भाव असतो. हा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी कापसावर प्लास्टिक पेपर टाकून झाकण्याचा सल्ला ममुराबाद कृषी विज्ञान केंद्रातील तज्ज्ञांनी कीटकशास्त्रज्ञांनी दिला आहे.

पायोमोट्स ट्रीटीसी ही कीड उघड्या डोळ्यांनी दिसत नाही. या किडीचा आकार १/४ ते १/एमएम असून, सूक्ष्म दर्शकातून ती दिसते. चिगर-माइट मानवी त्वचेच्या संपर्कात आली की त्वचेवर खूप खाज येणारे पुरळ येतात.

या वर्षी हवामानातील सततचा बदल व दमटपणा यामुळे सदर माइटला पोषक वातावरण मिळाल्याने तिचा प्रादुर्भाव वाढला आहे. ७० ते ८० फेरेन हाईट तापमानाची आर्द्रता हिस पोषक आहे. कापसाच्या तंतुमुळे शेतकरी बांधवांना दमा,'ब्रँकायटीस, ऍलर्जी ऱ्हासयनायटीस आदी त्रासही बऱ्याच जणांना होत असतो, अशी माहिती त्वचारोग तज्ज्ञ डॉ. संतोष पाटील यांनी दिली.

हेही वाचा : नेट बँकिंग खात्यात ठेवा कमी रक्कम...जाणून घ्या कारण

गेल्या चार महिन्यांपासून योग्य भावासाठी बळीराजा वाट पाहात आहे. कपाशीवर झालेला खर्चही निघत नसल्याने किमान १० हजार रुपये भाव शेतकऱ्याला मिळणे गरजेचे आहे.

कापसाची परिस्थिती अशी झाली आहे, की शेतात उभी होती तेव्हा ही कीटकनाशक व आता घरात कापसाच्या रूपाने लक्ष्मी आली तरी त्यावर घरातच किडीचा प्रादुर्भाव झाल्याने पुन्हा त्यावर कीटकनाशक फवारणी करावी लागत आहे. कापूस घरात व शेतकरी शेतात झोपायला जात आहे, अशी परिस्थिती सद्या काही घरांमध्ये पाहायला मिळत आहे.

शेतकऱ्यांसाठी शासनाने शेतमाल साठवणूक योजनेंतर्गत वेयर हाऊस बांधणे किती गरजेचे आहे, हे लक्षात येत असून, त्या दृष्टीने प्रयत्न व्हावे.

काय काळजी घ्यावी

घरात असलेल्या कापसावर ‘लायझोल’सारखे कीडनाशक पाण्यात मिसळून फवारणी केली असता किडीचा प्रादुर्भाव कमी होऊ शकतो. घरातील आर्द्रता ५० टक्क्यांपेक्षा कमी असावी म्हणून घर दिवसा उघडे असावे व ३ ते ४ तास उन्ह घरात पडणे गरजेचे असते. अत्यंत बारीक कपडे परिधान करावे, मात्र कॉटनचे कपडे टाळावे.

कारण ही कीड कॉटन सूत याकडे आकर्षित होते. कपडे, मॅट्रेस, पायपुसणी, अंथरूण हे गरम पाण्यात धुवून कडक उन्हात वाळू घालावे. कारण कापूस जरी विकला तरी ही कीड या कॉटन असलेल्या कपड्यात घरात राहू शकते. व्हॅक्यूम क्लिनरने कापसावरील धूळ व कीड दोघेही शोषले जातात.

"बुरशीमुळे कोळी प्रकारच्या किडी घरात साठविलेल्या कापसात आल्या आहेत. घरात साठवून ठेवलेल्या ओलसर कापसामुळे ही समस्या दिसत आहे. ती अंगावर आल्यास खाज सुटते. त्वचारोग होऊ शकतो. ही कीड दिसत नाही. कापसावर मीठ टाकून किंवा कुठल्या फवारणीने ही समस्या आटोक्यात येत नाही. कापसावर पूर्णतः प्लास्टिक पेपर टाकून कापूस साठवून ठेवावा. यामुळे ही समस्या दूर होऊ शकते." - डॉ. हेमंत बाहेती, कीटकशास्त्रज्ञ तथा प्रमुख, कृषी विज्ञान केंद्र, ममुराबाद (ता.जळगाव)

"घरातील हवा खेळती असावी. ही कीड चावत नाही. मात्र तिचा व तिच्या विष्टेचा त्वचेला संपर्क आल्यास तीव्र खाज व पुरळ अंगावर येतात व तो संपर्क होऊ नये म्हणून त्वचेकर माध्यम बॅरिअर म्हणून घट्ट खोबरेल तेल लावले असता तो संपर्क येत नाही." - डॉ. संतोष पाटील, त्वचारोग तज्ज्ञ, सिल्लोड