जळगाव : वितरणातील त्रुटीमुळे दूषित पाणीपुरवठा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jalgaon Contaminated water supply Inspection by Commissioner

जळगाव : वितरणातील त्रुटीमुळे दूषित पाणीपुरवठा

जळगाव : गेल्या काही दिवसांपासून शहरात होत असलेल्या दूषित पाणीपुरवठ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त विद्या गायकवाड यांनी गुरुवारी वाघूर पाणीपुरवठा योजनेवरील जलशुद्धीकरण केंद्राची पाहणी केली. ही प्रक्रिया ‘ओके’ असून, वितरणातील त्रुटींमुळे दूषित पाणी येत असल्याचे सूत्रांनी सांगितले. जळगाव शहरात काही दिवसांपासून दूषित पाणपुरवठा होत असून, पिवळसर पाण्याबद्दल अनेक भागांतून तक्रारी होत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने पाण्याचे नमुने सादर करून याबाबत महापालिकेवर धडक दिली होती.

आयुक्तांकडून पाहणी

या विषयाची दखल घेत महापालिका आयुक्त विद्या गायकवाड यांनी गुरुवारी वाघूर पाणीपुरवठा योजनेंतर्गत प्रकल्पाजवळ कार्यान्वित असलेल्या जलशुद्धीकरण केंद्राला भेट दिली. त्यांनी जलशुद्धीकरणाची संपूर्ण प्रक्रिया व त्यासंबंधी सर्व घटकांची माहिती जाणून घेतली. त्यांच्यासमवेत पाणीपुरवठा उपअभियंता गोपाळ लुले, केमिस्ट श्‍यामकांत भांडारकर व कर्मचारी उपस्थित होते.

यामुळे दूषित पाणी

उमाळा येथील जलशुद्धीकरण केंद्रातील एक हजार २०० मिलिमीटर व्यासाच्या व्हॉल्व्हचा गिअर नादुरुस्त झाल्यामुळे प्रक्रियेत व्यत्यय आला व त्यामुळे काही काळ दूषित पाणीपुरवठा झाल्याची माहिती त्यांना या वेळी देण्यात आली. औरंगाबाद येथून व्हॉल्व्ह तातडीने मागवून तो बसविण्यात आला असून, पाणीपुरवठा सुरळीत करण्यात आला आहे.

वितरण यंत्रणा सदोष

या व्हॉल्व्हच्या नादुरुस्तीमुळे दूषित पाणीपुरवठा झाल्याचे सांगण्यात येत असले, तरी शहराला पाणीपुरवठा करणारी एकूणच वितरण यंत्रणा सदोष असल्याचेही बोलले जात आहे. एकतर मुख्य जलवाहिनी व उपवाहिन्या जीआय व पीव्हीसी असल्याने उन्हाळ्यात त्यामुळे पाणी पिवळसर होते. शिवाय, काही ठिकाणी जलवाहिनीत गळती असल्यामुळे दूषित पाणीपुरवठा होतो, अशी माहितीही मिळाली. त्यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची गरज असताना, महापालिकेची पाणीपुरवठा यंत्रणा याबाबत उदासीन असल्याचे दिसते.

अशी आहे यंत्रणा

वाघूर पाणीपुरवठा योजनेंतर्गत वाघूर धरणातून पाण्याची उचल केली जाते. प्रकल्पातील पाणी जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत आणण्यात येते. ६५ एमएलडी (दशलक्ष घनफूट प्रतिदिन) क्षमतेची दोन जलशुद्धीकरण केंद्रे असून, त्याद्वारे शुद्धीकरण होऊन एक हजार २०० मिलिमीटर व्यासाच्या जलवाहिनीतून जळगाव शहरापर्यंत पाणी आणले जाते. त्यानंतर ते शहरातील विविध टाक्यांपर्यंत उपवाहिन्यांद्वारे पोचविले जाते.

आकडे बोलतात...

८०-८५ एमएलडी प्रकल्पातून पाण्याची उचल

130 एमएलडी शुद्धीकरण केंद्र क्षमता

Web Title: Jalgaon Contaminated Water Supply Inspection By Commissioner

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :JalgaonwaterWater supply
go to top