Jalgaon District Milk Union Fraud : मुख्य सूत्रधार चंद्रकांत पाटील गजाआड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

The police arrested the main facilitator from Ayodhyanagar on Wednesday in the case of misappropriation in the district milk union.

Jalgaon District Milk Union Fraud : मुख्य सूत्रधार चंद्रकांत पाटील गजाआड

जळगाव : जिल्हा दूध संघातील अपहार प्रकरणातील प्रमुख सूत्रधार चंद्रकांत मोतीराम पाटील यांना अयोध्यानगरातून बुधवारी (ता. १६) सकाळी अकराला शहर पोलिसांच्या तपास पथकाने ताब्यात घेतले. दूधसंघाचे अटकसत्र सुरू झाल्यापासून चंद्रकांत पाटील यशवंतनगरातील घर सोडून शालकाच्या घरी आश्रयाला होते. मात्र पोलिसांनी त्यांचा माग काढत अखेर अटक केली. चंद्रकांत पाटलांसह रवी अग्रवाल या दोघांना न्यायालयाने पोलिस कोठडीत रवाना केले आहे. (Jalgaon District Milk Union Fraud Chief Facilitator Chandrakant Patil arrested jalgaon News)

जिल्हा दूधसंघात अपहार व चोरीच्या दोन तक्रारीनंतर सरकार पक्षातर्फे सहाय्यक निरीक्षक संदीपसिंग परदेशी यांच्या फिर्यादीवरून फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. आमदार मंगेश चव्हाण आणि खडसे गटातर्फे मनोज लिमये यांच्या तक्रारी अर्जाची चौकशी करताना आढळून आलेल्या तथ्यावरून दाखल या गुन्ह्यात दूधसंघात एकूण एक कोटी १५ लाख रुपयांचा अपहार करून शासनाची फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले आहे.

जिल्हा दूधसंघातील अपहार प्रकरणी सोमवारी (ता. १४) रात्री नऊला संस्थेचे कार्यकारी संचालक मनोज लिमये यांच्यासह हरी रामू पाटील, किशोर काशीनाथ पाटील, अनिल हरिशंकर अग्रवाल यांना अटक करण्यात आली. न्यायालयाने यापूर्वीच त्यांना पाच दिवसांची कोठडी सुनावली असून, अकोल्यातून अटक करण्यात आलेल्या रवी मदनलाल अग्रवाल यांच्यासह आज अयोध्यानगरातून अटक करण्यात आलेले चंद्रकांत मोतीराम पाटील ऊर्फ सी. एम. पाटील याच्या मदतीने रवी अग्रवाल यांना अखाद्य तूप खाद्य म्हणून पुरविण्याची जबाबदारी सोपविण्यात आली होती. या अखाद्य आणि बी-ग्रेड तुपाचा वापर चॉकलेट तयार करणाऱ्या कारखान्यांमध्ये सर्रास करण्यात येत होता.

हेही वाचा: Nashik Crime News : काम देण्याच्या बहाण्याने 47 लाखांची फसवणूक

शालकाच्या घरी आश्रयाला

दूधसंघ अपहार प्रकरणात अटकसत्र सुरू होताच पहिल्याच दिवशी चौघांना अटक झाली. रात्रीतून अकोल्यातून रवी अग्रवालला ताब्यात घेण्यात आले. दुसरीकडे अटकेच्या भीतीने यशवंतनगरातील रहिवासी चंद्रकांत मोतीराम पाटील यांनी औद्योगिक वसाहत परिसरातील अयोध्यानगरात वास्तव्याला असलेल्या शालकाच्या घरी आश्रय घेतला होता.

ते भूमिगत झाल्याची खात्रीलायक माहिती मिळताच आज सकाळी अकराला तपासाधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीपसिंह परदेशी, रवींद्र पाटील आदींनी आयोध्यानगरात धडक दिली. अटकेनंतर सीएम पाटीलसह रवी अग्रवाल अशा दोघांना न्या. आर. वाय. खंडारे यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले असता, दोघांना चार दिवस, १९ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

हेही वाचा: School Nutrition Scheme : महागाईत खिचडीला किरकोळ दरवाढीची फोडणी