जळगावात ऑपरेशन कोविड.. डॉ. रामानंद यांच्याकडे "डीन'ची धुरा 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 12 June 2020

आरोग्य विभागाने तातडीने त्यांच्या जागी अधिष्ठाता म्हणून डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्याकडे धुळे महाविद्यालयासह जळगावचा अतिरिक्त कार्यभार सोपविला. रुग्णसंख्या दीडहजार पार व बळींची सव्वाशेवर गेलेली संख्या नियंत्रित करण्यासाठी डॉ. रामानंद यांच्या मदतीसाठी अन्य 16 डॉक्‍टरांच्या टीमची नियुक्तीही करण्यात आली आहे.

जळगाव : शासकीय महाविद्यालय तथा जिल्हा रुग्णालयातील कोविड कक्षातील वृद्धेच्या शौचालयातील मृत्यू प्रकरणात डॉ. भास्कर खैरे यांच्यांसह तिघांची विकेट गेल्यानंतर आरोग्य विभागाने तातडीने त्यांच्या जागी अधिष्ठाता म्हणून डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्याकडे धुळे महाविद्यालयासह जळगावचा अतिरिक्त कार्यभार सोपविला. रुग्णसंख्या दीडहजार पार व बळींची सव्वाशेवर गेलेली संख्या नियंत्रित करण्यासाठी डॉ. रामानंद यांच्या मदतीसाठी अन्य 16 डॉक्‍टरांच्या टीमची नियुक्तीही करण्यात आली आहे.
जळगावातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या कोविड कक्षातील शौचालयात आठवड्यापासून बेपत्ता कोरोनाग्रस्त वृद्धेचा मृतदेह बुधवारी आढळून आल्यानंतर राज्यभरात खळबळ उडाली होती. या प्रकरणाची आरोग्य विभागाने गंभीर दखल घेऊन महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे यांच्यासह दोन सहयोगी वैद्यकीय अधिकारी डॉ. सुयोग चौधरी व डॉ. कल्पना धनकवार यांच्यावर गुरुवारी निलंबनाची कारवाई केली. महाविद्यालयातील पॅरामेडिकल स्टाफमधील आणखी काही जण कारवाईच्या रडारवर आहेत. 

नव्या टीमची नियुक्ती 
आरोग्य विभागाचे संचालक तथा राज्याचे कोविड-19चे नोडल अधिकारी डॉ. तात्याराव लहाने यांनी तातडीने सूत्रे हलवत गुरुवारीच डॉ. खैरे यांच्या रिक्त जागी तसेच कोविड रुग्णालयातील उपचारांची गुणवत्ता, समन्वय सुधारण्यासाठी नव्या अधिष्ठातांसह वैद्यकीय अधिकारी म्हणून 16 जणांची टीम नियुक्त केली आहे. या सर्व अधिकाऱ्यांना तातडीने 12 जूनलाच जळगावी शासकीय महाविद्यालयातील प्रतिनियुक्तीचा पदभार स्वीकारण्यासंबंधी सूचना दिल्या आहेत. 

नव्या टीममधील अधिकारी असे 
धुळे येथील भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालयातील औषधशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्याकडे जळगाव महाविद्यालयाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे. त्यांच्या मदतीला चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालयातील प्रा.डॉ. अरुण हुमणे, मुंबईतील ग्रॅंट महाविद्यालयातील सहयोगी प्रा. डॉ. मधुकर गायकवाड, अहमदनगर येथील प्रा.डॉ. भारत चव्हाण, लातूर महाविद्यालयाचे डॉ. व्यंकटेश जोशी, डॉ. श्‍याम तोष्णीवाल, अंबेजोगाई येतील डॉ. उदय जोशी व डॉ. देवानंद पवार, लातूर येथील डॉ. अतुल गारजे, डॉ. मृदूल पाटील, डॉ. रणजित एस., डॉ. किरण माळी, अंबेजोगाई येथील डॉ. प्रवीण बोदेवार, डॉ. मोहीत खरे, नागपूर वैद्यकीय महाविद्यालयातील डॉ. प्रवीण पवार, डॉ. महेश चावट, डॉ. शशांक मोडक यांचा समावेश आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: jalgaon kovid-19 news dean dr ramanand appointed