Market Committee News : जळगाव बाजार समितीत सभापती कोण? | Jalgaon Market Committee Chairman Three aspirants from Mva BJP Sena preparing for election Jalgaon News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jalgaon Market Committee election

Market Committee News : जळगाव बाजार समितीत सभापती कोण?

Jalgaon News : कृषी उत्पन्न बाजार समिती सभापतिपदासाठी शनिवारी (ता. २०) निवड होणार आहे. महाविकास आघाडी प्रणीत पॅनलला बहुमत मिळाले आहे. त्यांच्यातर्फे तीन जण इच्छुक आहेत.

मात्र, भाजप-शिंदे गट शिवसेनेनेही तयारी केली असून, ‘आमचाच सभापती होईल’, असा त्यांचा दावा आहे.

जळगाव बाजार समिती निवडणुकीत कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस व शिवसेना (ठाकरे गट )प्रणीत महाविकास आघाडीला ११ जागा मिळाल्या आहेत, तर भाजप-शिवसेना शिंदे गटाच्या पॅनलला आठ जागा मिळाल्या आहेत. (Jalgaon Market Committee Chairman Three aspirants from Mva BJP Sena preparing for election Jalgaon News)

त्यामुळे बहुमत असलेल्या महाविकास आघाडीचा सभापती होण्याची शक्यता आहे. मात्र, महाविकास आघाडीतील पदाची चुरस लक्षात घेऊन भाजप-शिवसेना शिंदे गटानेही आपले डाव टाकण्यास सुरूवात केल्याचे सांगण्यात येत आहे.

महाविकास आघाडीर्फे सुनील महाजन, श्‍यामकांत सोनवणे व लक्ष्मण गंगाराम पाटील ऊर्फ लकी टेलर इच्छुक आहेत. आगामी काळात तिघांनाही संधी देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

पहिल्या वर्षी आपल्यालाच संधी मिळावी, यासाठी तिघेही प्रयत्नशील असल्याचे सांगण्यात येत आहे. महाविकास आघाडीचे नेते गुलाबराव देवकर यांच्याकडे हा चेंडू आहे. ते यातून कसा मार्ग काढणार, याकडे लक्ष लागले आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

दरम्यान, भारतीय जनता पक्ष व शिंदे गटाच्या आघाडीला सभापतिपदासाठी चार सदस्यांची आवश्‍यकता आहे. महाविकास आघाडीतील चुरस लक्षात घेऊन त्यांनी आपले डाव टाकून आपलाच अध्यक्ष बनविण्याची तयारी आहे.

भाजप नेते व ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, शिवसेना शिंदे गटाचे नेते व पालकमंत्री गुलाबराव पाटील या आघाडीचे नेतृत्व करीत आहेत.

राज्यात सत्तेवर असलेले नेते बाजार समितीवर आपली सत्ता आणण्यासाठी काय किमया करणार, याकडेही आता लक्ष लागून आहे.

"सभापती निवडीसाठी महाविकास आघाडीच्या संचालकांची शुक्रवारी (ता. १९) बैठक होणार आहे. त्यात सर्वानुमते नाव निश्‍चित करण्यात येईल."

-गुलाबराव देवकर, गटनेते, महाविकास आघाडी गट

"जळगाव बाजार समितीत सभापती आमच्याच गटाचा होणार आहे. भाजप- शिवसेना शिंदे गटाचीच सत्ता येईल, एवढी आपणास खात्री आहे."

-नीलेश पाटील, जिल्हाप्रमुख, शिवसेना (शिंदे गट)