Jalgaon News : मनपाचे 946 कोटी 75 लाखांचे सुधारित अंदाजपत्रक मंजूर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jalgaon Municipal Corporation

Jalgaon News : मनपाचे 946 कोटी 75 लाखांचे सुधारित अंदाजपत्रक मंजूर

जळगाव : महापालिका आयुक्तांनी २०२३-२४ चे ८८६ कोटी ७५ लाखांचे अंदाजपत्रक सादर केले. त्यात नगरसेवकांनी विकासकामांसाठी ६० कोटींची तरतूद सुचविली आहे. आता एकूण ९४६ कोटी ७५ लाखांचे अंदाजपत्रक एकमताने मंजूर करण्यात आले.

जळगाव महापालिकेची अंदाजपत्रकाची तहकूब सभा बुधवारी (ता. २९) सतरा मजल्याच्या दुसऱ्या मजल्यावरील सभागृहात झाली. पीठासीन अध्यक्षपदी महापौर जयश्री महाजन होत्या. उपायुक्त कुलभूषण पाटील, नगरसचिव सुनील गोराणे उपस्थित होते. आयुक्तांनी सादर केलेल्या अंदाजपत्रकात सदस्यांनी वाढ सूचविली, तसेच अंदाजपत्रकाच्या अंमलबजावणीबाबतही मते मांडली.

तरतुदीची अंमलबजावणी व्हावीच : लढ्ढा

शिवसेना (ठाकरे गट) गटनेते नितीन लढ्ढा म्हणाले, की महापालिकेतर्फे पाच वर्षांत अंदाजपत्रक सादर झाले. त्यानंतर आयुक्त बदलले व महापौरही बदलले. मात्र, अंदाजपत्रकात आपण ज्या तरतुदी केल्या, त्याची अंमलबजावणी होऊ शकली नाही. प्रत्येक वर्षी आपण अंदाजपत्रकात तरतूद करतो.

मात्र, पैशांअभावी त्याची अंमलबजावणी होऊ शकत नाही. त्याची अंमलबजावणीच होत नसेल, तर तरतूद तरी का करतो? त्यामुळे आपण जनतेची एकप्रकारे फसवणूकच करतो. त्यामुळे प्रशासनाने प्रथम वसुली करण्याची गरज आहे. त्या अधारेच विकासकामे होऊ शकतात. त्यामुळे अंदाजपत्रकातील तरतुदीला कोणताही अर्थ नाही, हे सर्व खोटे आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

उत्पन्नात वाढ करण्याची गरज : त्रिपाठी

भाजपचे नगरसेवक विशाल त्रिपाठी यांनी महापालिकेच्या उत्पन्नात वाढ झाली, तरच विकासकामे होणार असल्याचे मत व्यक्त केले. ते म्हणाले, की प्रशासनाने घरपट्टी, खुला भूखंड तसेच इतर करवसुलीसाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. त्यांनी वाढ सुचविली.

खुला भूखंड कर दहा कोटी, मालमत्ता कर ३५ कोटी, महापालिका व्यापारी संकुलातील गाळे वसुली १०१ कोटी, स्मशानभूमी व्यवस्था दहा लाख, उद्याने सुशोभीकरण २५ लाख, रस्ते व दुरुस्ती दोन कोटी, गटार व्यवस्था तीन कोटी, व्यापारी संकुल दुरुस्ती पाच कोटी. याशिवाय प्रत्येक नगरसेवकाला प्रभागात विकासकामे करण्यासाठी २५ लाख रुपये निधी देण्याची सूचना त्यांनी केली.

मालमत्तेचे मूल्याकंन करा : ॲड. शुचिता हाडा

भाजपच्या नगरसेविका ॲड. शुचिता हाडा यांनी महापालिकेच्या मालमत्तेचे मूल्याकंन करण्यासाठी मालमत्ता व्यवस्थापन हा नवीन विभाग तयार करून त्यामार्फत सर्व मालमत्तांचे मूल्याकंन करून घ्यावे. त्यासाठी एक कोटीची तरतूद करावी, असे मत व्यक्त केले.

दीक्षा भूमीसाठी पाच कोटींची तरतूद : उपमहापौर

उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी दीक्षाभूमी उभारण्यसाठी पाच कोटींची तरतूद करण्याचा प्रस्ताव दिला. मेहरूण, पिंप्राळा व खेडी भागात शेतकरी राहत असल्याने त्या ठिकाणी जनावरांना पाणी पिण्यासाठी गावहाळ तयार करण्याचा प्रस्ताव देऊन ५० लाखांची तरतूद करण्याची मागणी केली. त्यांनी मिळकत कराची वसुली वाढविण्याबाबत प्रशासनाला सूचना केल्या.

मनपा इमारतीवर सौरऊर्जा प्रकल्प : महापौर

महापौर जयश्री महाजन यांनी महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीवर सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यावर भर दिला. त्यामुळे वीजबचत होईल. त्यासाठी एक कोटीची तरतूद करण्याचा प्रस्ताव दिला. इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन ‘पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशीप’मधून (पीपीपी) उभारून महापालिकेचा निधी वाचवावा, अशी सूचना केली.

पुतळ्यासाठी पाच कोटींची तरतूद : पोकळे

शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक ॲड. दिलीप पोकळे यांनी शहरात पुतळे उभारण्यासाठी पाच कोटींच्या निधीची तरतूद व्यक्त केली. यासाठी प्रशासनाने केवळ दोन कोटी ठेवले होते.

वसुलीत वाढ करा : कैलास सोनवणे

भाजपचे नगरसेवक कैलास सोनवणे यांनी विकासासाठी निधी आवश्‍यक असतो. त्यामुळे प्रशासनाने मिळकत करवसुलीत वाढ करावी, असे मत व्यक्त केले.