जळगाव : फुले मार्केटच्या अतिक्रमणावर 'सीसीटीव्हीची' नजर

महापालिकेची नवीन शक्कल, फुले मार्केट असोसिएशनला दिले पत्र
Jalgaon Phule Market encroachment under CCTV
Jalgaon Phule Market encroachment under CCTVSakal

जळगाव : शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या फुले मार्केट व सेंट्रल फुले मार्केटमधील वाढते अतिक्रमण महापालिकेला डोकेदुखी ठरत आहे. त्यावर नियंत्रण करण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची शक्कल महापालिकेने लढविली असून, त्यासाठी फुले मार्केट असोशिएशनलाही पत्रही दिले आहे. फुले मार्केट व सेंट्रल फुले मार्केट भागाताील अतिक्रमण महापालिकेने अनेकवेळा हटविले आहे. मात्र, त्याठिकाणी पुन्हा पुन्हा अतिक्रमण होते. विशेष म्हणजे आता हे अतिक्रमण एवढे वाढले आहे, की मूळ दुकानापेक्षा अतिक्रमणच अधिक झाले आहे.

अतिक्रमणासोबत ‘दादागिरी’

फुले मार्केट व सेंट्रल फुले मार्केट भागात अतिक्रमण झाले आहे. मात्र, त्यासोबतच अतिक्रमणधारकांची ‘दादागिरी’ही सुरू असल्याच्या तक्रारी आहेत. व्यापाऱ्यांच्या अगदी दुकानाजवळ अतिक्रमणधारक दुकाने लावत आहेत. काही बोलल्यास दुकानदाराला ‘दादागिरी’ केली जात आहे. चार ते पाच जण मिळून काही जागा घेतल्या आहेत व त्या भाडेतत्त्वावर विक्रेत्यांना दिल्या आहेत. त्यामुळे त्यांच्यातही कधी कधी वाद होत असतात. त्यामुळे दुकानदारांना दुकाने लावणेही आता कठीण झाले आहे. ग्राहकांना तर ये-जा करण्यासही जागा राहत नाही.

असोशिएशनची मागणी

मार्केटमधील अतिक्रमण हटविण्यात यावे, अश मागणी फुले मार्केट व सेंट्रल फुले मार्केट व्यापारी असोशिएशनने केली आहे. याबाबत त्यांनी महापालिकेला पत्र दिले असून, आम्ही महापालिकेला कर देऊनही आम्हाला व्यवसाय करणे कठीण झाले आहे. त्यामुळे अतिक्रमणावर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

सीसीटीव्ही बसविणार

मार्केटमधील अतिक्रमणावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. सध्यस्थितीत असलेले अतिक्रमण काढण्यासाठी त्यांनी शहर पोलिस ठाण्याकडे बंदोबस्ताची मागणी केली आहे. अतिक्रमण संपूर्ण काढल्यानंतर पुन्हा अतिक्रमण होऊ नये, तसेच मार्केटमध्ये कोणताही अनुचित प्रकार होऊ नये, यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय घेतला आहे. व्यापारी असोसिएशन त्यांच्या खर्चाने सीसीटीव्ही कॅमेरे बसवून घेतील. त्यांचे शहर पोलिस ठाणे व महापालिकेच्या प्रभाग कार्यालयात नियंत्रण असेल. अतिक्रमणधारक दिसल्यास, तसेच कोणताही अनुचित प्रकार झाल्यास तातडीने त्याच्यावर कारवाई करण्यात येईल. याबाबतचे पत्र व्यापारी असोसिशनला दिले असून, त्यांच्या मंजुरीनंतर पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याचे महापालिकेतर्फे सांगण्यात आले.

फुले, सेंट्रल फुले मार्केटमधील अतिक्रमण काढण्यासाठी आम्ही पोलिस बंदोबस्त मागितला आहे. त्यानंतर ही कारवाई करण्यात येईल. नवीन अतिकम्रण होणार नाही, यासाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी नियंत्रण करण्यात येईल. याबाबत आम्ही व्यापारी असोसिएशनला पत्र दिले आहे.

-श्‍याम गोसावी उपायुक्त, महापालिका, जळगाव

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com