Jalgaon E Machine : जळगावचे रस्ते साफ करणार इलेक्ट्रीक झाडू; महापालिका खरेदी करणार मशीन | Jalgaon roads will be cleaned by electric broom municipality will purchase machine news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jalgaon Municipal Corporation

Jalgaon E Machine : जळगावचे रस्ते साफ करणार इलेक्ट्रीक झाडू; महापालिका खरेदी करणार मशीन

Jalgaon News : शहरातील रस्ते साफ करण्यासाठी पुन्हा इलेक्ट्रीक झाडू फिरणार आहे. महापालिका शासकीय निधीतून एक मशीन खरेदी करणार आहे, तसेच ई वाहनांसाठी चार चार्जिंग स्टेशन शहरात उभारण्यात येणार आहेत. (Jalgaon roads will be cleaned by electric broom municipality will purchase machine news)

जळगाव शहरातील रस्ते साफ करण्यासाठी तत्कालीन नगरपालिका असताना, इलेक्ट्रीक झाडू फिरत होते. नगरपालिकेने मक्ता तत्वावर हे झाडू घेतले होते. त्यामुळे रस्त्यावर धूळ साफ होत होती. कालांतराने हे झाडू बंद करण्यात आले.

आता तब्बल २० वर्षांनंतर शहरातील रस्त्यावर इलेक्ट्रीक झाडू फिरणार आहे. मात्र, आता मक्ता तत्वावर नव्हे; तर महापालिका शासकीय निधीतून एक झाडू खरेदी करणार आहे.

स्वच्छता निधी दोन कोटी

राष्ट्रीय स्वच्छता अभियानांतर्गत प्रत्येक महापालिकेचा निधी देण्यात येत आहे. या अंतर्गत पर्यावरण रक्षणासाठी काम करण्याची गरज आहे. महापालिकेकडे तब्बल दोन कोटी ६० लाख रुपयांचा हा निधी प्राप्त आहे.

या निधीतून महापालिकेने पर्यावरण रक्षण व स्वच्छतेच्या हेतूने दोन उपक्रम हाती घेतले आहेत. यात स्वच्छतेसाठी इलेक्ट्रीक झाडू खरेदी करण्यात येणार आहे. रस्ते साफ करण्यासाठी एक कोटी, १६ लाख रुपयांचे मशीन खरेदी करण्यात येणार आहे. त्यातून शहरातर्गंत महामार्ग व शहरातील मुख्य रस्त्यांची सफाई करण्यात येणार आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

ई वाहनासाठी चार्जिंग स्टेशन

शहरात पर्यावरण राखण्यासाठी ई वाहनांना प्रोत्साहन देण्यात येणार आहे. त्यासाठी ई वाहनांचे चार्जिंग स्टेशन उभारण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. ३५ लाख रुपयांचे चार चार्जिंग स्टेशन महापालिकेतर्फे उभारण्यात येणार आहेत. लोकांना प्रोत्साहित करण्यासाठी प्रारंभी महापालिकेतर्फे मोफत चार्जिंग करून देण्यात येईल. त्यानंतर युनिटनिहाय आकारणी महापालिकेतर्फे करण्यात येणार आहे. शासनाच्या निधीतून हा उपक्रम असणार आहे.

शहरातील रस्त्याच्या कामांना प्राधान्य

शहरातील सर्वच भागांतील रस्त्याच्या कामांना महापालिकेतर्फे प्राधान्य देण्यात येणार आहे. रस्त्याची कामे तातडीने व्हावी, यासाठी महापालिकेच्या सर्व विभागांतील अभियंत्यांना सूचना देण्यात आल्या आहेत, तर शासकीय निधीतून करण्यात येणारे रस्ते त्वरित करावेत, यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्र देण्यात येणार आहे.

"पर्यावरण राखण्यासाठी शासनाचे निर्देश असून, उपक्रम राबविण्यसाठी निधी उपलब्ध आहे. त्या निधीतून इलेक्ट्रक झाडू मशीन व चार्जिंग स्टेशन उभारण्याचा उपक्रम राबविण्यात येत आहे. याशिवाय शहरातील रस्त्यांची कामे वेगाने करण्याकडेही प्राधान्याने लक्ष देण्यात येत आहे." -डॉ. विद्या गायकवाड, आयुक्त, महापालिका