Jalgaon ST Division : जळगाव एसटी विभाग महाराष्ट्रात अव्वल! सलग 3 दिवस 1 कोटीचे उत्‍पन्न | jalgaon ST Division top in Maharashtra 1 crore income for 3 consecutive days news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

MSRTC ST Bus

Jalgaon ST Division : जळगाव एसटी विभाग महाराष्ट्रात अव्वल! सलग 3 दिवस 1 कोटीचे उत्‍पन्न

Jalgaon ST Division : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या जळगाव विभागाने महाराष्ट्रातील सर्व विभागांना मागे टाकत ७ मेस उत्पन्नाचा एक कोटीचा आकडा पार केला. आकडेवारीनुसार ७ मेपासून आजपर्यंत आलेले उत्पन्न एक कोटीपेक्षा जास्त आहे.

जळगाव विभागाचा अव्वल क्रमांक आला आहे. राज्‍य सरकारने ज्‍येष्ठ नागरिक, महिलांना ५० टक्‍के सवलत दिली आहे. यामुळे ‘आता प्रवास करेल, तर एसटी बसनेच’, असे चित्र सध्‍या पाहावयास मिळत आहे.

यात लग्‍नसराईमुळे गर्दी वाढली आहे. यामुळे बसस्‍थानकात मोठी गर्दी पाहावयास मिळत आहे. याचा चांगला परिणाम म्‍हणून एसटीच्‍या उत्‍पन्नात वाढ झाली आहे. (jalgaon ST Division top in Maharashtra 1 crore income for 3 consecutive days new)

जळगाव विभागाची हॅट्रट्रिक

जळगाव विभागाने ७ ते ९ मे, असे सलग तीन दिवस एक कोटीपेक्षा जास्त उत्पन्न मिळवून दिले. यात ९ मेस २ लाख ६३ हजार प्रवाशांनी बसने प्रवास केला. यात ९८ हजार महिलांचा समावेश आहे.

त्याचप्रमाणे अमृत योजनेंतर्गत ३५ हजार प्रवाशांनी प्रवास केला. त्याचा निधीही जळगाव विभागाला मिळणार असून, प्रतिदिन बेरीज केली, तर दीड कोटीपेक्षा जास्त उत्पन्न आणण्याचा नवीन विक्रम जळगाव विभागाने केला आहे.

मंगळवारी (ता. ११) आगारातून ६९९ बसांनी दोन लाख ८० हजार किलोमीटर अंतर कापले. सवलतीपोटी येणारा महिलांचा निधी अद्याप शासनाकडून प्राप्त झालेला नाही.

चालक, वाहकांचा सत्कार

उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टीने जळगाव विभागातील १ हजार २६२ चालक, ३७९ चालक कमवाहक व १ हजार ४४० वाहकांनी यशस्वी कामगिरी केली. यामुळे प्रातिनिधिक स्वरूपात सर्वांत जास्त उत्पन्न असणाऱ्या चालक, वाहकांचा सत्कार विभाग नियंत्रक भगवान जगनोर यांच्या हस्ते करण्यात आला.

यात अकील मनियार, उमेश वाणी, योगेश वाणी, संतोष धाडी, सुनील पाटील, श्रीकृष्ण चौधरी, शैलेंद्र जाधव, राजू नन्नवरे, प्रदीप पाटील यांचा समावेश होता.

५० टक्‍के ज्‍येष्ठ व महिला प्रवासी

राज्‍य परिवहन महामंडळाच्‍या बसमध्‍ये महिला व अमृत योजनेंतर्गत ज्‍येष्ठ नागरिकांची संख्‍या वाढली आहे. ५० टक्‍के प्रवासी ज्‍येष्ठ नागरिक व महिला आहेत.

"जळगाव विभागाने सलग तीन दिवस एक कोटीपेक्षा जास्‍त उत्‍पन्‍न मिळवून राज्‍यात अव्‍वल स्‍थान मिळविले आहे. कोरोनानंतर असलेली मोठी लग्‍नसराई, तसेच महिला व ज्‍येष्ठ नागरिकांना दिलेल्‍या सवलतीमुळे प्रवासी संख्‍येत वाढ झाल्‍याने इतके उत्‍पन्‍न मिळू शकले. यात कर्मचाऱ्यांचीही मेहनत आहे." - भगवान जगनोर, विभागीय नियंत्रक, जळगाव

टॅग्स :JalgaonMSRTC