जळगाव : ऑनलाइनची दोन वर्षे... तरी ३७ टक्केच शिक्षक तंत्रस्नेही | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

teacher

जळगाव : ऑनलाइनची दोन वर्षे... तरी ३७ टक्केच शिक्षक तंत्रस्नेही

जळगाव : शाळा- महाविद्यालये बंद असल्याने शिक्षण ऑनलाइन होऊन दोन वर्षे लोटली. आधीच डिजिटल झालेले विद्यार्थ्यांचा तंत्रज्ञान वापर झालाच, पण शिक्षकही टेक्नोसेव्ही झालेत.. अर्थात, दोन वर्षांत शिक्षकांचे तंत्रस्नेही होण्याचे प्रमाण ३७ टक्केच आहे. त्यातही प्राथमिक विभागातील केवळ १८ टक्के शिक्षकच तंत्रस्नेही होऊ शकलेत, असे एका सर्वेक्षणातून समोर आलेय. कोरोनामुळे सर्वच क्षेत्रातील परिमाणे बदलली.. जीवनशैलीतही बदल झाला.. शिक्षणाच्या मार्गाची तर दिशाच बदलली.. शाळा, महाविद्यालये, खासगी शिकवणीचे वर्ग सारेच बंद झाले.

शिक्षण झाले ऑनलाइन

शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी म्हणून यंत्रणेने दूरस्थ शिक्षणात डिजिटलचा वापर करणे स्वीकारले आणि शाळा, महाविद्यालयातील वर्ग ऑनलाइन झाले. दोन वर्षांपासून नर्सरीपासून महाविद्यालयीन स्तरापर्यंतचे विद्यार्थी झूम, गुगल मीट, मायक्रोसॉफ्ट मीट आदी ॲपद्वारे घरबसल्या वर्गांना हजेरी लावू लागले.. आधीच तंत्रज्ञानाच्या आहारी गेलेल्या विद्यार्थ्यांना हा बदल स्वीकारणे कठीण गेले नाही. नर्सरी ते चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी आवडीने हे तंत्रज्ञान आत्मसात केले..

शिक्षकही बनले तंत्रस्नेही

विद्यार्थ्यांचा प्रश्‍न नव्हता, अडचणी होती ती शिक्षकांची. तरीही शाळा, महाविद्यालये व क्लासेस सुरू होण्याबाबत अनिश्‍चितता असल्याने शिक्षकांनाही ऑनलाइनचा पर्याय स्वीकारणे अपरिहार्य बनले आणि त्यांनीही ही वाट धरली. मिळेल त्या पद्धतीने शिक्षकांनी ऑनलाइनसाठी स्वत: धडे गिरवले आणि ऑनलाइन शिक्षणाचे पर्व सुरू झाले.

दोन वर्षांनंतरही...

दोन वर्षे झाली या ऑनलाइन शिक्षण प्रणालीला.. पण, अद्यापही बहुतांश शिक्षकांना हे तंत्रज्ञान आत्मसात करणे आणि त्याचा वापर अद्याप जमलेला नाही. आतापर्यंत अवघे ३७ टक्के शिक्षकच याद्वारे तंत्रस्नेही बनू शकले आहेत. त्यातही नर्सरी ते चौथीपर्यंत शिकविणाऱ्या शिक्षकांचे प्रमाण अजूनही अवघे १८ टक्केच आहे, असे तज्ज्ञांनी केलेल्या सर्वेक्षणातून समोर आले आहे.

हेही वाचा: "मी पुन्हा येतेय, काहीतरी तुफानी करुयात"; अमृता फडणवीसांचं सूचक ट्विट

असे आहेत सर्वेक्षणातील निष्कर्ष

  • स्मार्ट फोनचाच वापर अधिक

  • लॅपटॉप, टॅब, संगणकाचा वापर करणारे ६ टक्केच

  • खेळ, आकृत्या, युनिट टेस्ट घेणाऱ्यांचे प्रमाण १७ टक्केच

  • गुगल मीट, झूम वापरणारे ९ टक्केच

  • पीपीटी, नकाशे, चित्रांचा वापर करणारे २२ टक्के

  • ऑनलाइनमध्येही ५२ टक्के शिक्षकांचे शिकवणे कंटाळवाणे

"ऑनलाइन शिक्षणाचा दोन वर्षांचा प्रवास आश्‍चर्यकारक आहे. मात्र, या प्रवासात ३७ टक्के शिक्षकच तंत्रस्नेही झाल्याचे दिसते. प्रत्यक्षात त्यात ग्रामीण भागातील शिक्षकांचे प्रमाण १० टक्क्यांच्या आतच आहे. ऑनलाइन शिक्षणाचा पर्याय शाश्‍वत नसला तरी शिक्षकांनी आता ‘डिजिटली अपडेट’ राहणे आवश्‍यक आहे."

- चंद्रकांत भंडारी (शिक्षणतज्ज्ञ)

loading image
go to top