
Jalgaon Unseasonal Rain : भुसावळ पट्ट्यात वादळी पावसाचे थैमान; जामनेर तालुक्यात गारपीट
Jalgaon News : हवामान खात्याने वर्तविलेले अंदाजानुसार शहरासह तालुक्याला गुरुवारी (ता. २८) दुपारी सुमारे एक तास गारपिटीसह वादळी पावसाने चांगलेच झोडपून काढले. (Jalgaon Unseasonal Rain with hailstorm bhusawal news)
दरम्यान, जामनेर तालुक्यातील अनेक गावांमध्ये दुसऱ्या दिवशीही गारपीट झाली तर यावल तालुक्यातील न्हावी परिसरात वादळी पावसाने केळी बागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. दरम्यान, चहार्डी (ता. चोपडा) येथे वीज कोसळून नऊ मेंढ्या मृत्यमुखी पडल्या तर मुलगा भाजला गेला.
भुसावळ तालुक्यात साकेगाव, बेलव्हाय, सुनसगाव, वेल्हाळ्यात शेतकऱ्यांचे मोठे प्रमाणात नुकसान झाले तर काही घरांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने नागरिकांचे हाल झाले. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे कांदा, केळी पीक उद्ध्वस्त झाले असून, कापणीला आलेला मका, गहू, हरभरा शेतातच आडवा झाला आहे.
पावसामुळे शेतकऱ्यांचे किती नुकसान झाले, याचा अंदाज येऊ शकला नाही. वादळी वाऱ्यामुळे रस्त्यामध्ये अनेक झाडे पडल्याने बऱ्याच वेळ वाहतुकीची कोंडी झाली. तसेच वादळी पावसाने शहरासह तालुक्यातील वीज तार तुटल्याने वीज खंडित झाली होती.
या अवकाळी पावसाने एका शेतकऱ्यांची एक म्हैस मरण पावल्याची माहिती ग्रामस्थांकडून मिळाली. उपविभागीय अधिकारी जितेंद्र पाटील व तहसीलदार दीपक धिवरे यांच्याशी भुसावळ शहरासह तालुक्यातील नुकसानीसंदर्भात संपर्क साधला असता दोघा अधिकारी नॉट रिचेबल होते.
हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार
न्हावी परिसरात दाणादाण
परिसरात गुरुवारी (ता. २७) दुपारी साडेतीनला वादळी पावसाने हजेरी लावली. यात केळी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. काही भागात छोट्या प्रमाणावर गार पडली असून, मोठमोठी झाडे पडल्याने रस्ते बंद झाले होते.
येथील बहेराम बुवा मंदिराजवळील मराठी मुलाच्या शाळेतील लिंबाचे झाड उन्मळून पडले. न्हावी -मारुळ बायपासवरील टपरी व गॅरेजवर वीजतारा पडल्याने वीजपुरवठा खंडित केला आहे.
सुदैवाने जीवितहानी टळली. शासनाने त्वरित पंचनामे करावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. याबाबत वीजतारांचा सिमेंटचा खांब तुटल्यामुळे सावदा येथून आणल्यावर बसविला जाईल व त्या भागातील वीजपुरवठा सुरळीत होईल, इतर भागातील वीजपुरवठा सुरळीत आहे, अशी माहिती न्हावी कक्षाचे सहायक अभियंता धनंजय चौधरी यांनी दिली.
जामनेर तालुक्यात दुसऱ्या दिवशीही गारपीट
येथून जवळच असलेल्या हिवरखेडा (तवा), शेंगोळा, चिंचखेडा, लोणी (ता. जामनेर) येथे गुरुवारी दुसऱ्या दिवशीही दुपारी अडीचला वादळासह जोरदार गारांचा पाऊस झाला. या गारपिटीने मका, बाजरी, कांदा पिकासह आंब्याच्या कैऱ्याचे मोठे नुकसान झाले असून, अनेक वृक्ष पडले आणि घरावरील टिनपत्रेही उडाली. अर्धा तास झालेल्या आवळ्याएव्हढ्या गारा व जोरदार पावसाने शेतात पाणी साचले असून, चिखल झाला आहे.
वाकडी परिसरात नुकसान
वाकडी परिसरात वादळी वाऱ्यासह गारपिटीसह जोरदार पावसाने दुपारी दोनला वाजता हजेरी लावली लग्न सोहळ्यात वऱ्हाडी मंडळींसह वधु-वराचे हाल झाले. बचावासाठी वऱ्हाडींनी घराचा आश्रय घेतला तर काहींनी बुद्धविहारात धाव घेतली.
लग्न समारंभातील वऱ्हाडींची त्रेधातिरपीट झाली. पावसामुळे लग्न सोहळ्यात विघ्न निर्माण झाले. शेवटी पाऊस कमी झाल्यावर साध्या पद्धतीने विवाह सोहळा संपन्न झाला. हिवरखेडा (तवा) येथील लग्नसोहळ्यात निर्माण झाले होते. अचानक आलेल्या वादळी वारा व गारपिटीने परिसरातील झाडे रस्त्यावर उन्मळून पडून मोठे नुकसान झाल्याचे दिसून आले.
थोरगव्हाणला झाडावर पडली वीज
थोरगव्हाण रस्त्यावरील एका लिंबाच्या झाडावर वीज पडली. आणि निंबाच्या झाडाला भेट पडली. या वेळी झाडावरील पक्षांचा मृत्यू झाला. मात्र सुदैवाने इतर मानवी जीवितहानी ठरली. बुधवारी (ता. २६) व गुरुवारी (ता. २७) दिवसभर ढगाळ वातावरण कायम आहे. अधूनमधून पावसाच्या सरी ही कोसळल्या.
चहार्डीला विजेचे तांडव
चहार्डी (ता. चोपडा) शिवारात गुरुवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसात मेंढ्यांच्या कळपावर वीज कोसळल्याने नऊ मेंढ्या जागीच ठार झाल्या. विजेची झडप बसल्याने पंधरा वर्षांचा मुलगा देखील भाजला गेला. दरम्यान, नैसर्गिक आपत्तीत ठार झालेल्या मेंढ्यांची तत्काळ भरपाई मिळावी, अशी मागणी मेंढपाळ बांधवांनी केली आहे.