Jalgaon Water Management : जिल्ह्यात पालिकांतर्फे 4 ते 8 दिवसांआड पाणी! टंचाईच्या झळा सुरू | Jalgaon News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jalgaon News

Jalgaon Water Management : जिल्ह्यात पालिकांतर्फे 4 ते 8 दिवसांआड पाणी! टंचाईच्या झळा सुरू

Jalgaon News: जिल्ह्यात मार्च महिना सुरू होऊन पंधरवडा उलटत आहे. आतापासूनच तापमानाचा पारा ३२.५ ते ३७ अंशांदरम्यान आहे. दर वर्षी जिल्ह्यात तापमानाचा पारा ४७ ते ४८ अंशापर्यंत जातो. त्यामुळे एप्रिल-मे महिन्यादरम्यान पाणीटंचाई त्या प्रमाणात जाणवते.

पाणीटंचाई निवारणार्थ आराखड्यानुसार विहिरी अधिग्रहणासह पाणीपुरवठ्याचे नियोजन केले आहे. सध्या पालिका, नगर परिषदा, ग्रामपंचायतीद्वारे चार ते आठ दिवसांनंतर पाणीपुरवठा केला जात आहे.

उन्हाची तीव्रता वाढल्याने सिंचन प्रकल्पातील पाणीसाठा कमी होऊन ५४ टक्केच पाणीसाठा आहे. अजून अडीच महिने. जून महिना सुरू होण्यास बाकी आहे. तोपर्यंत पाण्याच्या झळा किती तीव्र होताहेत, हे येणारा काळच ठरविणार आहे. (Jalgaon Water Management Water every 4 to 8 days by municipalities in district Scarcity starts news)

आगामी काळात जिल्ह्यात वाढत्या तापमानानुसार ४३२ गावांना संभाव्य पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात हतनूर, गिरणा, वाघूर या तीन मोठ्या प्रकल्पांसह अन्य लहान-मोठ्या प्रकल्पांत या वर्षी सरासरी ५४.८२ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.

जिल्ह्यात पाणीटंचाई जाणवू नये, यासाठी जिल्हास्तरीय कालवा समिती सदस्यांच्या जलव्यवस्थापन बैठकीत टंचाई आराखड्यानुसार नियोजन केले आहे.

हतनूर प्रकल्पासह गिरणा प्रकल्पातून सिंचन, पिण्याच्या पाण्याचे आवर्तन असून, गिरणा प्रकल्पातून सिंचनासाठी सोडण्यात आलेला पाणीप्रवाह किमान २५ मार्चपर्यंत सुरू राहणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील पाणीपुरवठा योजनांद्वारे पिण्याच्या पाण्याची उपलब्धता होणार आहे.

गिरणा प्रकल्पातून सिंचनाचे तीन, तर पिण्याच्या पाण्यासाठी दोन, असे पाच आवर्तन देण्यात येणार आहेत. त्यानुसार आतापर्यंत दोन आवर्तन गिरणा प्रकल्पातून सोडण्यात आले आहेत. रब्बी हंगामासाठी गिरणा धरणातून तिसरे आवर्तन सोडण्यात आले आहे.

पाण्याचा जपून वापर करा...

जिल्ह्यात प्रकल्पांत सरासरी ५५ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. उपलब्ध प्रकल्पीय साठ्यानुसार पेयजल, तसेच सिंचनासाठी पाणीटंचाई आराखड्यानुसार प्रशासनाने नियोजन केले आहे. बहुतांश तालुक्यात आठ दिवसांआड, तर ग्रामीण भागात तीन ते चार दिवसांआड नियोजनानुसार पाणीपुरवठा केला जात आहे.

असे असले, तरी नागरिकांकडून अंगणात पाणी मारणे, वाहने धुण्यासाठी, बांधकामासाठी कूपनलिकेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर वापर केल्याने पाण्याची नासाडी होऊन भूगर्भातील पाण्याची पातळी खालावत आहे. उपलब्ध पाणीसाठ्यानुसार पाणी जपून वापरण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

पाणीटंचाईची शक्यता लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने उपाययोजना आखल्या आहेत. आगामी काळात १९ विंधन विहिरी ताब्यात घेतल्या जाणार असून, ४०२ विहिरी अधिग्रहित केल्या जाणार आहेत. पाणीटंचाई जाणवू नये, तसेच ग्रामीण भागतील विहिरींना पाणी उपलब्ध करण्यासाठी गिरणा पाटबंधारे विभाग सतर्क राहणार आहे.

हेही वाचा : देशातले ३२ म्युच्युअल फंडांचं व्यवस्थापन आहे महिलांच्या हाती...

पिण्याच्या पाण्यासाठी दोन आवर्तने

जिल्ह्यात टंचाईग्रस्त गावांसाठी, तिथल्या अधिग्रहित केलेल्या विहिरींसाठी गिरणा प्रकल्पातून पाच, तर बोरी प्रकल्पातून तीन तालुक्यांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध करण्यासाठी प्रशासनाने नियोजन केले आहे. गिरणा आणि बोरी नदीच्या माध्यमातून प्रत्येकी दोन आवर्तने सोडण्यात येणार आहेत.

प्रकल्प -- पाणीसाठा (दलघमी)

वाघूर -- १९६.९

हतनूर -- १७४.५

गिरणा -- २२०.३८

अंजनी -- ६.१७

बहुळा -- ८.२७

हिवरा -- ४.२४

अग्नावती -- १.१७

भोकरबारी -- ०.३८

बोरी -- ८.९५

मन्याड -- १७.४७

सोबतच सुकी, अभोरा, तोडापूर, मंगरूळ, मोर, गुल आदी प्रकल्पांत ७० ते ७५ टक्के, असे जिल्ह्यातील एकूण ९६ लघुमध्यम मोठ्या प्रकल्पात सरासरी ७८२.५५ दक्षलक्ष घनमीटरनुसार ५४.८२ टक्के उपयुक्त जलसाठा आहे.

शहरांचा होणार पाणीपुरवठा असा

शहर - दिवसाआड

भुसावळ -- ८ ते १०

धरणगाव -- १०

पारोळा -- ८ ते १०

बोदवड -- ८

चाळीसगाव -- ४ ते ५

जळगाव -- २ ते ३

पाचोरा -- ५

भडगाव -- ३

एरंडोल -- ३

चोपडा -- ४

जामनेर -- २

यावल -- ४

अमळनेर -- ३

मुक्ताईनगर -- १

रावेर -- १