
Video Viral : "जळगावच्या मन्या सुर्वे"ची भरचौकात भाईगिरी; शून्य मिनीटात भाईची हवा पोलिसांनी उतरवली
जळगाव : जळगाव येथील एका चौकातील भाईचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. त्यानंतर पोलिसांनी या भाईला चांगलीच अद्दल घडवली असून या घटनेचा व्हिडिओसुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झालाय. जळगावचा मन्या सुर्वे असं कॅप्शन टाकून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला होता.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये दोन व्यक्ती बोलेरो गाडीच्या बोनेटवर बसून चौकात भाईगिरी करताना दिसत आहे. तर एकजण या प्रकाराचा व्हिडिओ शूट करताना दिसत आहे. जवळ आल्यानंतर गाडीवर बसलेले दोन जण जल्लोष करत आहेत. जळगावचा मन्या सुर्वे विठ्ठल दादा असं कॅप्शन टाकत हा व्हिडिओ व्हायरल केला होता.
हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर विठ्ठल बाबर पाटील, (राहणार आयोध्यानगर, जळगाव) व्यक्तीला पोलिसांनी चांगलीच अद्दल घडवली असून त्याला कॅमेऱ्यासमोर माफी मागायला लावली आहे. त्याच्या माफीचा व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
"मी माझ्या मित्राच्या गाडीच्या बोनेटवर बसून आकाशवाणी चौकात राऊंड मारत होते. त्यावेळी माझ्या मित्राने हा व्हिडिओ जळगावचा मन्या सुर्वे असं कॅप्शन टाकून व्हायरल केला. ही माझी चूक होती, अशी चुकी तुम्ही करू नका, कायद्यापेक्षा मोठा कुणी नाही." असं म्हणत पोलिसांनी या विठ्ठलला माफी मागायला लावली आहे.